Karnataka Election: आज कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले. मतदानानंतर एक्झिट पोलही आले. बहुतांशी एक्झिट पोलमध्ये काँग्रेसला बहुमत मिळणार असल्याचे सांगितेल जात आहे. दरम्या, यावर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सर्व एक्झिट पोल 100 टक्के बरोबर नसतात, असं बोम्मई म्हणाले आहेत.
एक्झिट पोटनंतर माध्यमांशी संवाद साधताना बोम्मई म्हणतात, आम्ही पूर्ण बहुमताने विजयी होऊ आणि कर्नाटकात पुन्हा एकदा भाजपचे सरकार स्थापन होईल, असा आम्हाला विश्वास आहे. आमच्या कामांमुळे डबल इंजिन सरकारला जनतेने कौल दिला आहे. गेल्या वर्षांत जनतेला दिलेले प्रत्येक वचन आम्ही पूर्ण केले आणि आता आम्ही कर्नाटकला पुढे नेऊ, त्यामुळेच जनतेने आम्हाला कौल दिला आहे.
मला 200% विश्वास आहे, पूर्ण बहुमताने पुन्हा सत्तेत येऊ. एक्झिट पोल घाईघाईने केले जातात आणि त्यात अनेक चुका होतात. कोणीही किंगमेकर होण्याचा प्रश्नच नाही. माझ्यासाठी जनता किंगमेकर आहे आणि तेच भाजपला पुन्हा सत्तेत आणतील, अशी प्रतिक्रीया बसवराज बोम्मई यांनी व्यक्त केली. दरम्यान, कर्नाटक विधानसभा निवडणूक 2023 साठी आज मतदान झाले. निवडणुकीचा निकाल 13 मे रोजी लागणार आहे. कर्नाटक निवडणुकीत मुख्य लढत भाजप, काँग्रेस आणि जेडीएसमध्ये होती. मात्र, यावेळीही जेडीएस किंग मेकर ठरत असल्याचे दिसत आहे.