"कर्नाटक म्हणजे लोकसभा नाही, हुरळून जाऊ नका!" शशी थरुर यांचा काँग्रेसला सल्लावजा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2023 08:19 AM2023-06-17T08:19:30+5:302023-06-17T08:20:14+5:30
कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला मोठा विजय मिळाला. परंतु आता यावरून काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांनी आपल्या पक्षाला हुरळून न जाण्याचा सल्ला दिलाय.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला मोठा विजय मिळाला. परंतु आता यावरून काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांनी आपल्या पक्षाला हुरळून न जाण्याचा सल्ला दिलाय. राज्य आणि लोकसभेदरम्यान मतदार आपले विचार बदलू शकतात, त्यामुळे हुरळून जाऊ नये, असं शशी थरुर म्हणाले. यासाठी त्यांनी राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये गेल्या वेळी काँग्रेसच्या विजयानंतर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या खराब कामगिरीचा दाखला दिला.
"२०१८ मध्ये आम्ही केवळ कर्नाटकातच नाही, तर राजस्थान, छत्तीसगढ आणि मध्यप्रदेशातही विजय मिळवला होता. यानंतरही जेव्हा लोकसभेच्या निवडणुका आल्या तेव्हा त्या त्या तिन्ही राज्यांमध्ये भाजपचं आमचा पराभव केला. कर्नाटकात केवळ एकच जागा मिळाली होती," असं थरुर म्हणाले. शशी थरूर यांनी नुकत्याच झालेल्या जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलच्या वॅलाडोलिड एडिशनच्या निमित्ताने पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना यावर भाष्य केलं.
"लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये असलेल्या काही महिन्यांत मतदार आपले विचार बदलू शकतात. त्यामुळे आपण आत्मसंतुष्ट राहू नये," असं ते म्हणाले. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला २२४ पैकी १३५ जागांवर विजय मिळाला होता. तर भाजपला केवळ ६६ जागांवर समाधान मानावं लागलं होतं. मजबूत आणि प्रभावी स्थानिक नेतृत्वामुळे, तसंच स्थानिक मुद्द्यांना प्राधान्य दिल्यानं कर्नाटकात विजय मिळाल्याचंही त्यांनी सांगितलं.
स्थानिक नेत्यांचं नेतृत्व
"काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे हेदेखील कर्नाटकातील आहेत. राहुल आणि प्रियांका गांधीदेखील या ठिकाणी प्रचारासाठी पोहोचले होते. परंतु स्थानिक नेत्यांनी या ठिकाणी नेतृत्व केलं हे महत्त्वाचं आहे. स्थानिक मुद्दे , आर्थिक मुद्दे, बंगळुरूतील पायाभूत सुविधांसारख्या मुद्द्यांवर भर देण्यात आला होता," असं थरुर यांनी स्पष्ट केलं.
म्हणून भाजपचा पराभव
"भाजपचा निवडणूक प्रचार केंद्राने चालवला होता. भाजप स्थानिक पातळीवर कमकुवत आहे. लोकांना माहीत होतं की, पंतप्रधान मोदी आणि अमित शाह कर्नाटकात सरकार चालवायला येणार नाहीत. लोकांना बदल हवा होता," असंही त्यांनी नमूद केलं.
"मतभेद स्वाभाविक आहेत. राजकारणात लोकांच्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षा असणं स्वाभाविक आहे. ते पक्षाच्या विचारधारेशी आणि पक्षाच्या एकूण अजेंडासाठी वचनबद्ध असू शकतात. तो अजेंडा पुढे चालवण्यासाठी आपण अधिक योग्य आहोत असं प्रत्येक व्यक्तीला वाटू शकतं," असं थरुर म्हणाले.