बंगळुरू : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या 222 जागांसाठी मतदान होत आहे. 224 जागांपैकी 222 जागांसाठी मतदार मतदानाचा हक्क बजावत आहेत. काँग्रेस, भाजपा आणि जनता दल सेक्यूलर अशी तिरंगी लढत याठिकाणी आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाने आर. आर. नगरमधील मतदान पुढे ढकलण्याचा निर्णय शुक्रवारी घेतला. याच मतदार संघात सुमारे 10 हजार बनावट मतदार ओळखपत्रे सापडली होती. त्यामुळे येथे 28 मे रोजी मतदान होईल व 31 मे रोजी निकाल लागेल. अन्य 222 मतदार संघांचा निकाल मात्र 15 मे रोजी लागणार आहे.
कर्नाटकातील निवडणूक भाजपा व काँग्रेस या दोन्हींसाठी अटीतटीची असून, तिथे कोणाला बहुमत मिळते वा कोणाचे सरकार स्थापन होते, यावर या दोन पक्षांचे भवितव्य अवलंबून आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाची तिथे जसा कस लागणार आहे, तसाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिश्मा आजही कायम आहे का, हेही दिसून येणार आहे. आर. आर. नगरमधील काँग्रेसच्या उमेदवाराविरुद्ध आचारसंहितेचा गुन्हा दाखल झाल्याचे वृत्त आहे, तर एका मंत्र्याच्या सहकाऱ्यावर प्राप्तिकर विभागाने छापे घातल्याचे सांगण्यात येत आहे.
भाजपाच्या उमेदवाराने खाण घोटाळ्यातून बाहेर येण्यासाठी माजी सरन्यायाधीशांच्या नातेवाइकांना लाच देऊ केल्याची चित्रफीत काही वृत्तवाहिन्यांनी दाखविल्यानंतर त्या उमेदवारांवर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसने निवडणूक आयोगात जाऊ न केली.जनमत चाचण्यांनी कोणालाही स्पष्ट बहुमत मिळणार नाही आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) हा पक्ष ज्याला पाठिंबा देईल, तोच सत्तेवर येईल, असे म्हटले आहे.
LIVE Updates :
- मतदानामध्ये वाढ होईल, जनता कर्नाटकातील सिद्धरामय्या सरकारला हटवण्याचा विचार करत आहे. मोठ्या संख्याने लोक मतदानासाठी बाहेर पडतील - केंद्रीय मंत्री सदानंद गौडा- जनता सिद्धरामय्या सरकारला कंटाळली आहे, मी लोकांना विनंती करतो की भाजपाला मत द्यावे - बी. एस. येडीयुरप्पा (भाजपा)
- कर्नाटक विधानसभेच्या 222 जागांसाठी मतदानाला सुरुवात