कर्नाटकात 18 मे रोजी शपथविधी सोहळा; कोणाच्या गळ्यात पडणार मुख्यमंत्रिपदाची माळ?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2023 08:37 PM2023-05-14T20:37:23+5:302023-05-14T20:38:09+5:30
कर्नाटक काबीज केल्यानंतर आता काँग्रेससमोर मुख्यमंत्री निवडीचे मोठे आव्हान असणार आहे.
Karnataka Election: 13 मे रोजी कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले. या निवडणुकीत काँग्रेसने घवघवीत यश मिळवले. पण, अद्याप पक्षाकडून मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरवण्यात आलेला नाही. डीके शिवकुमार आणि सिद्धरमय्या मुख्यमंत्रिपदासाठी प्रमुख दावेदार असून, या दोघांपैकी एकाच्या नावाची घोषणा होऊ शकते. यादरम्यान नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्याची तारीख ठरवण्यात आली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, येत्या 18 मे रोजी नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा होणार आहे. सोनिया गांधीं, राहुल गांधी आणि प्रियांका गांधींसह पक्षाचे सर्व ज्येष्ठ नेते या सोहळ्यात उपस्थित राहणार आहेत. याशिवाय, काँग्रेसकडून समविचारी पक्षांनाही निमंत्रणे पाठवली जाणार आहेत. मात्र, सध्या काँग्रेससमोर सर्वात मोठे आव्हान मुख्यमंत्री निवडीचे आहे. पर्यवेक्षकांनी सर्व आमदारांशी चर्चा केल्यानंतरच कर्नाटकात पुढील मुख्यमंत्री कोण असेल याचा निर्णय घेतला जाईल.
'पक्षासाठी खूप त्याग केला'
काँग्रेसकडून लवकरच मुख्यमंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. या सगळ्या दरम्यान कर्नाटकातील पक्षाचे अध्यक्ष डीके शिवकुमार यांनी मोठे वक्तव्य केले आहे. पक्षासाठी मी अनेकवेळा त्याग केला आहे, असे त्यांनी रविवारी म्हटले. कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डीके शिवकुमार यांनी रविवारी काँग्रेसच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या लिंगायत समाजाचे धार्मिक केंद्र असलेल्या तुमकूर येथील सिद्धगंगा मठाला भेट दिल्यानंतर हे वक्तव्य केले.
'सिद्धरामय्या यांच्याशी मतभेद नाहीत'
डीके शिवकुमार म्हणाले की, काही लोक म्हणत आहेत की, सिद्धरामय्या यांच्याशी माझे मतभेद आहेत. परंतु मला हे स्पष्ट करायचे आहे की, अशा सर्व गोष्टी चुकीच्या आहेत. सिद्धरामय्या आणि माझ्यात कोणतेही मतभेद नाहीत. मी पक्षासाठी अनेकदा त्याग केला आहे आणि सिद्धरामय्या यांच्या पाठीशी उभा राहिलो आहे. मी सिद्धरामय्या यांना नेहमीच पाठिंबा दिला आहे.