कर्नाटकमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. दरम्यान, भाजपाने यावेळी अनेक प्रस्थापितांना उमेदवारी नाकारली होती. त्यात कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टार यांनाही उमेदवारी नाकारण्यात आली. दरम्यान, शेट्टार आता काँग्रेसकडून उमेदवारी मिळवून निवडणूक लढवत आहेत. मात्र आरोपांची फैर झाडत भाजपा सोडल्यानंतरही जगदीश शेट्टार यांनी आपल्या कार्यालयामधून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची छायाचित्रं हटवलेली नाहीत. त्यामुळे एकच चर्चा होत आहे. दरम्यान, अशा प्रकारे छायाचित्रे हटवणे योग्य ठरणार नाही, असं विधान शेट्टार यांनी केलं आहे.
शेट्टार म्हणाले की, मी हुबळी-धारवाड विधानसभा मतदारसंघात भाजपाच्या जनाधाराची पायाभरणी केली होती. १९९४ पूर्वी येथे भाजपाचं अस्तित्व नव्हतं. शेट्टार सध्या जोरदार सभा घेत आहेत. तसेच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसोबत प्रचारामध्ये गुंतले आहेत. मात्र त्यांच्या घरात असलेल्या कार्यालयामधील भिंतीवर असलेली पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची छायाचित्रे लक्ष वेधून घेत आहेत.
मात्र अशा प्रकारे छायाचित्र लावलेली असली तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे, असं विधान त्यांनी केलं आहे. ते म्हणाले की, एका पक्षातून दुसऱ्या पक्षात गेल्यानंतर लगेच आधीच्या नेत्यांचे फोटो हटवणं ही काही चांगली बाब नाही. मी असं करू शकत नाही. दरम्यान, जगदीश शेट्टार आणि त्यांच्या पत्नीने आपण मोदी आणि शहांचा सन्मान करतो, असे अनेकदा सांगितले आहे.
ही निवडणूक माझ्यासाठी आत्मसन्मानाची लढाई आहे. राजकीय महत्त्वाकांक्षेची नाही. माझा आत्मसन्मान दुखावला गेला आहे. त्यामुळे मी माझ्या स्वत:च्या शांतीसाठी बिनशर्त काँग्रेसमध्ये दाखल झालो आहे. भाजपाने मला इथून निवडणूक लढवण्याची शेवटची संधी देऊन सन्मानाने निरोप घेण्याची संधी द्यायला हवी होती. मात्र बी. एल. संतोष यांच्यामुळे असं होऊ शकलं नाही, असा आरोप त्यांनी केला.