मोदी चीन दौऱ्यात डोकलामबद्दल चकार शब्दही काढणार नाहीत- राहुल गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2018 06:09 PM2018-04-27T18:09:50+5:302018-04-27T18:09:50+5:30
राहुल गांधी यांची मोदींवर जळजळीत टीका
कर्नाटक: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चीन दौऱ्यावर टीका केली आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त असलेल्या राहुल यांनी मोदींवर तिरकस शब्दांमध्ये निशाणा साधला. 'मोदी चीनच्या अध्यक्षांची अनौपचारिक भेट आहेत. या भेटीत त्यांनी डोकलाम आणि चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडर या दोन मुद्यांवर नक्की चर्चा करावी. यासाठी मी मोदींना पाठिंबा देईन,' असं राहुल गांधी यांनी म्हटलंय.
पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या चीन दौऱ्यावर आहेत. यासाठी मोदी काल रात्री उशिरा चीनमध्ये दाखल झाले. मोदी आज दिवसभरात सहावेळा जिनपिंग यांची भेट घेतील. दोन्ही नेत्यांमधील या भेटीगाठी अनौपचारिक स्वरुपाच्या असतील. या भेटींना सुरुवातदेखील झालीय. मोदींच्या या 'अनौपचारिक' दौऱ्यावर राहुल गांधी यांनी तिरकसपणे टीका केलीय. 'मी तुम्हाला लिहून देतो, चीन दौऱ्यात मोदी डोकलामच्या मुद्यावर तोंडातून एक शब्दही काढणार नाहीत,' असं राहुल यांनी म्हटलं.
राहुल गांधी यांनी कर्नाटक निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. यावेळी त्यांनी जनसभेला संबोधित केलं. 'देशात दररोज बलात्काराच्या घटना समोर येत आहेत आणि मोदी चीनच्या अध्यक्षांसोबत झोपळ्यावर जाऊन बसले आहेत. चीनमध्ये मोदी डोकलामविषयी चकार शब्द काढणार नाहीत, हे तुम्ही लिहून घ्या. हीच आहे मोदींची 56 इंचांची छाती. खोटे शब्द आणि खोटी आश्वासनं,' अशा शब्दांमध्ये राहुल गांधींनी मोदींवर शाब्दिक हल्ला चढवला.