कर्नाटकात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. निकालाच्या कलांनुसार, काँग्रेस 129, जेडीएस 22 तर भाजपा 66 जागांवर आघाडीवर आहे. तर इतर 7 जण आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे. ठाकरे गटाने देखील कर्नाटक निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला डिवचलं आहे. "बजरंग बलीनेही कर्नाटकातील मोदींच्या प्रचाराला ठेंगा दाखवला" असं म्हणत खोचक टीका केली आहे.
ठाकरे गटाच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "बजरंग बलीनेही कर्नाटकातील मोदीजींच्या प्रचाराला ठेंगा दाखवला. मीडिया जेपी नड्डाजी किंवा सीएम बोम्मईजी यांचा चेहरा पराभूत म्हणून दाखवू शकतो पण पंतप्रधान मोदींचे अपयश आहे कारण त्यांनी संपूर्ण प्रचार स्वतःबद्दल केला आहे" असं प्रियंका चतुर्वेदी यांनी म्हटलं आहे.
संजय राऊत यांनी "देशाची मन की बात कर्नाटकच्या निकालातून बाहेर पडली, 2024 च्या निवडणुकीत जे कर्नाटकात झाले तेच देशात होईल. कर्नाटकच्या जनतेने खोके सरकारच्या नेत्यांना लाथाडले, राज्यातील मोठी टोळी कर्नाटकात गेली होती. कर्नाटकातील पराभव हा मोदींचा पराभव आहे. आपल्याच लोकांचा पराभव करण्यासाठी पैशांचा वापर खोके सरकारने केला" असं म्हणत भाजपावर हल्लाबोल केला आहे.
"कर्नाटक निवडणुकीत पंतप्रधानापासून भाजपा कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांनी मेहनत घेतली. आम्हाला बहुमत मिळाले नाही. अंतिम निकाल आल्यानंतर आम्ही त्याचे विश्लेषण करू आणि पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीत कमबॅक करू" असा विश्वास मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी व्यक्त केला. बेळगाव दक्षिण मतदारसंघातून भाजपाचे अभय पाटील विजयी झाले असून याठिकाणी महाराष्ट्र एकिकरण समितीचे रमाकांत कोंडुसकर यांनी दुसऱ्या क्रमांकाची मतं घेतली आहेत.