सख्खे भाऊ पक्के वैरी! माजी मुख्यमंत्र्यांचे दोन मुलगे कर्नाटकात लढताहेत, २००४ पासून उन-सावलीचा खेळ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2023 11:28 AM2023-05-13T11:28:37+5:302023-05-13T11:29:38+5:30
शिवमोग्गा जिल्ह्यातील सोबर मतदारसंघातून दोन सख्खे भाऊ एक काँग्रेस आणि दुसरा भाजपातून लढत आहे.
कर्नाटकमध्ये आज विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे. मतमोजणीला सुरुवात झाली असून काँग्रेस आघाडीवर आहे. भाजपाची मोठी पिछेहाट झाली आहे. अशातच कर्नाटकातील अशा काही लढती आहेत तिकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे. अशीच एक सीट आहे जिथे माजी मुख्यमंत्र्यांचे दोन मुलगे एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. सोरब मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री एस बंगारप्पा यांच्या दोन मुलांमध्ये लढत होत आहे.
शिवमोग्गा जिल्ह्यातील सोबर मतदारसंघातून दोन सख्खे भाऊ एक काँग्रेस आणि दुसरा भाजपातून लढत आहे. मोठा भाऊ कुमार बंगारप्पा भाजपाकडून आणि छोटा भाऊ मधु बंगारप्पा काँग्रेसच्या तिकीटावर उभे आहेत. महत्वाचे म्हणजे २०१८ मध्येही या दोघांमध्येच लढत झाली होती. तेव्हा कुमार यांनी मधू यांना 3,286 मतांनी पराभव केला होता. कुमार हे २०१८ मध्ये निवडणुकीच्या तोंडावर भाजपात गेले होते. तर मधु यांनी २०२१ मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मधु हे जेडीएसकडून आमदार होते. दोन्ही भाऊ २००४ पासून एकमेकांविरोधात लढत आहेत. तेव्हा तर एस बंगारप्पा देखील हयात होते.
कुमार यांनी 1996 (पोटनिवडणूक), 1999, 2004 आणि 2018 मध्ये चार वेळा सोराब जागेचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यांनी मंत्री म्हणूनही काम केले आहे. 2013 मध्ये मधु यांनी कुमार यांचा पराभव केला होता. दोन्ही भाऊ यापूर्वी कन्नड चित्रपटसृष्टीशी जोडले गेले होते. कुमार अभिनेता तर मधु अभिनेता आणि निर्माता होते.
आजच्या निवडणुकीत कुमार हे पिछाडीवर आहेत, तर मधु हे आघाडीवर आहेत. भाजपविरोधी लाटेचा फटका कुमार यांना बसला आहे. तर त्याचा फायदा मधू यांना मिळत असल्याचे दिसत आहे.