कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस मोठ्या विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे. काँग्रेसनं बहुमताचा जादुई आकडादेखील गाठला आहे. दुसरीकडे भाजपचा दक्षिणेचा बालेकिल्ला ढासळल्याचं चित्र निर्माण झालं आहे. यावर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आपली प्रतिक्रिया दिली. तसंच त्यांनी कर्नाटकातील जनतेचे आणि तेथील कार्यकर्ते, नेत्यांचे आभारही मानले.
“कर्नाटक निवडणुकीत एकीकडे भांडवलदारांची ताकद होती. तर दुसरीकडे गरीब जनतेची ताकद होती. जनतेच्या शक्तीनं ताकदीचा पराभव केला. हेच आता प्रत्येक राज्यात होईल. काँग्रेस कर्नाटकात गरीबांसोबत उभी राहिली. आम्ही गरीबांच्या मुद्द्यावर लढलो. आम्ही द्वेषानं, चुकीच्या शब्दांचा वापर करून ही लढाई लढलो नाही,” असं राहुल गांधी म्हणाले.
“आम्ही प्रेमानं ही लढाई लढलो. हा देशाला प्रेमच आवडतं हे कर्नाटकानं दाखवून दिलं. कर्नाटकात आता द्वेषाचा बाजार बंद झालाय आणि प्रेमाची दुकानं खुली झाली आहेत. हा सर्वांचा विजय आहे. सर्वप्रथम हा कर्नाटकातील जनतेचा विजय आहे. आम्ही कर्नाटकातील जनतेला ५ आश्वासनं दिली होती. आम्ही ती पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत पूर्ण करू” असंही त्यांनी स्पष्ट केल.
राहुल गांधींच्या १८ रॅली आणि रोड शो
कर्नाटकात काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांची भूमिका महत्त्वाची आहे, तसंच राहुल गांधी यांचादेखील मोठा हात आहे. भारत जोडो यात्रेदरम्यान ते २१ दिवस कर्नाटकात होते आणि ५०० किमी पेक्षा अधिक प्रवास पायी केला. निवडणुकीसाठीही त्यांनी १८ रॅली आणि रोड शो केले. याशिवाय मल्लिकार्जून खर्गेंनी ३५ रॅली, १ रोड शो आणि प्रियंका गांधींनी १४ रॅली आणि ११ रोड शो, सोनिया गांधींनीदेखील १ रॅली केली होती.