Karnataka Election Result 2023: बेळगाव जिल्ह्यात सतीश जारकीहोळी, रवी पाटील, विठ्ठल हलगेकर आघाडीवर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2023 11:03 AM2023-05-13T11:03:21+5:302023-05-13T11:04:22+5:30
निकालांबाबत उत्सुकता वाढली
बेळगाव : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठीची मतमोजणी सुरू झाली आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालात काँग्रेसने आघाडी घेतली आहे. काँग्रेसने सत्ताधारी भाजपाला जोरदार टक्कर दिली होती. आरपीडी महाविद्यालयात सुरु झालेल्या पोस्टल मतमोजणीत बेळगाव जिल्ह्यात विविध मतदार संघात विद्यमान आमदारपद भूषवित असलेल्या उमेदवारांनी आघाडी घेतली आहे.
यमकनमर्डी मतदार संघातून सतीश जारकीहोळी, ग्रामीण मतदार संघातून लक्ष्मी हेब्बाळकर, गोकाक मतदार संघातून रमेश जारकीहोळी तर निपाणी मतदार संघातून शशिकला जोल्ले आघाडीवर आहेत.
आरपीडी महाविद्यालयात सुरु असलेल्या मतमोजणी केंद्राबाहेर समर्थकांची गर्दी वाढत चालली असून कडेकोट पोलीस बंदोबस्तात तैनात करण्यात आला आहे. २२४ जागा असलेल्या कर्नाटक विधानसभेमध्ये बहुमताचा आकडा ११३ एवढा आहे. दरम्यान, आतापर्यंत हाती आलेल्या निकालामध्ये काँग्रेस १०० पेक्षा जास्त जागेवर आघाडीवर आहे. भाजपा ९८, जेडीएस १९ एवढ्या जागांवर आघाडीवर आहेत. तर कधी भाजपा पिछाडी भरून काढत काँग्रेसला गाठत आहे. त्यामुळे निकालांबाबत उत्सुकता वाढली आहे.
भाजपचे डॉ. रवी पाटील आघाडीवर
उत्तर मतदार संघात पाचव्या फेरीनंतरदेखील भाजप आघाडीवर असून भाजपचे डॉ. रवी पाटील १७११८ मतांनी आघाडीवर आहेत. त्यानंतर काँग्रेसचे असिफ सेठ १३९८५ मतांनी दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
खानापुरात भाजपचे हलगेकर आघाडीवर
खानापूर मतदार संघात मतमोजणीची सहावी फेरी पूर्ण झाली असून सहाव्या फेरीनंतर भाजपचे विठ्ठल हलगेकर २१८४६ मतांनी आघाडीवर आहेत. त्यापाठोपाठ काँग्रेसच्या अंजली निंबाळकर ७८३० मतांनी दुसऱ्या क्रमांकावर आहेत तर म. ए. समितीचे मुरलीधर पाटील हे तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
काँग्रेसचे सतीश जारकीहोळीच आघाडीवर
यमकनमर्डी मतदार संघात मतमोजणी सुरु झाल्यापासून काँग्रेसचे विद्यमान आमदार सतीश जारकीहोळीच आघाडीवर आहेत. ४५८६४ मतांनी सहाव्या फेरीनंतर सतीश जारकीहोळी यांनी आघाडी घेतली असून दुसऱ्या क्रमांकावर १८८४० भाजपचे बसवराज हुंदरी आणि १३४५९ मतांनी जेडीएसचे मारुती अष्टगी हे तिसऱ्या क्रमांकावर आहेत.