कर्नाटकात सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांच्यातील मुख्यमंत्रीपदावरून सुरू असलेला पेच अखेर सुटला. काँग्रेसनेसिद्धरामय्या यांना कर्नाटकचे मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचवेळी डीके शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्रीपदासाठी होकार दिला आहे. मात्र, या फॉर्म्युलावर काँग्रेसच्या आणखी एका ज्येष्ठ नेत्यानं प्रश्न उपस्थित केलाय. सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्री आणि शिवकुमार यांना उपमुख्यमंत्री करण्याच्या घोषणेनं दलित समाज दुखावला गेला असल्याचं वक्तव्य कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री जी परमेश्वर यांनी केलं.
सिद्धरामय्या यांच्या मागील सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असलेल्या जी परमेश्वर यांनी हायकमांडच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. “कर्नाटकमध्ये दलित व्यक्ती मुख्यमंत्री व्हावा अशी मागणी होती. पण असं झालं नाही. दलित समाज दुखावला गेला आहे. मलाही सरकार चालवता आलं असतं. मुख्यमंत्री नाही तर किमान मला उपमुख्यमंत्री बनवायला हवं होतं,” असं जी परमेश्वर म्हणाले.
अधिकृत घोषणा
कर्नाटकात सरकार स्थापनेचा फॉर्म्युला आता निश्चित झालाय. काँग्रेसचे महासचिव केसी वेणुगोपाल यांची पत्रकार परिषदेत यासंदर्भातील माहिती दिली. तसंच सिद्धरामय्या यांच्या हाती मुख्यमंत्रीपदाची धुरा सोपवण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तर दुसरीकडे डीके शिवकुमार यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपदाची सूत्रं सोपवली जाणार आहेत. याशिवाय २०२४ च्या लोकसभा निवडणुकांपर्यंत ते प्रदेशाध्यक्ष म्हणूनदेखील कार्यरत राहतील.
कर्नाटक ते दिल्ली १०० तास सुरू असलेल्या चर्चांनंतर मुख्यमंत्रीपदासाठी सिद्धरामय्या यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. सोनिया गंघी यांच्या हस्तक्षेपानंतर कर्नाटकातील राजकीय संकट सुटल्याचं म्हटलं जातंय. आता २० मे रोजी नवं सरकार स्थापन होणार आहे.