कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस मोठ्या विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहे. काँग्रेसनं बहुमताचा जादुई आकडादेखील गाठला आहे. दुसरीकडे भाजपचा दक्षिणेचा बालेकिल्ला ढासळला आहे. यानंतर काँग्रेस महासचिव जयराम रमेश यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार निशाणा साधला.
हाती येत असलेल्या कलांमध्ये काँग्रेसनं बाजी मारल्याचं दिसून येतेय. यानंतर काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी आनंद व्यक्त केला आणि त्यांनी भाजपवर निशाणा साधला. जसे कर्नाटकचे निकाल आले, आता काँग्रेसचा विजय झालाय आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पराभव झालाय हे निश्चित झालंय, असं ट्वीट त्यांनी केलं.
काँग्रेस बहुमताच्या दिशेनं
कर्नाटकात विधानसभा निवडणुकीनंतर आता मतांची मोजणी सुरू आहे. यामध्ये काँग्रेस सध्या बहुमताच्या दिशेनं वाटचाल करताना दिसतेय. कर्नाटकात काँग्रेस हा मोठा पक्ष ठरत आहे. दक्षिणेकडे कर्नाटक भाजपसाटी सर्वात महत्त्वाचं आणि बालेकिल्ला असल्याचे मानले जाते. २०२४ मध्ये लोकसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. अशातच आता दक्षिण भारतातील अन्य राज्यं तेलंगण, तामिळनाडू, केरळ आणि आंध्र प्रदेशासारख्या राज्यांमध्ये विजय मिळवणं भाजपसाठी आव्हानात्मक ठरू शकतं.
कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, तेलंगण, आंध्र प्रदेश आणि पदुच्चेरीसारख्या राज्यांच्या एकूण मिळून लोकसभेच्या १३० जागा आहेत. यांच्यापैकी भाजपकडे सध्या केवळ २९ जागा आहेत. त्यापैकी २५ जागा केवळ कर्नाटकातीलच आहेत. तेलंगणातून भाजपचे ४ खासदार आहेत. अशातच कर्नाटकातील पराभव भाजपला लोकसभेसाठीदेखील आव्हान ठरू शकतो.