कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा विजय जवळपास निश्चित झाला आहे. काँग्रेसला बहुमताहूनही अधिक जागा मिळाल्या आहेत. मात्र असं असतानाही पक्ष सावधपणे पावलं उचलत आहे. पक्षाला फोडाफोडीच्या राजकारणाची चिंता काँग्रेसला वाटत असून पक्षाने त्यादृष्टीने खबरदारीची पावलं उचलली आहेत. काँग्रेसने आपल्या विजयी उमेदवारांना ठेवण्यासाठी हैदराबादमध्ये एका फाईव्ह स्टार रिसॉर्टमध्ये ५० खोल्या बुक केल्या आहेत. काँग्रेस नेते बी.के. हरिप्रसाद यांनी याला दुजोरा दिला आहे. तसेच भाजपाच्या ऑपरेशन लोट्सपासून वाचण्यासाठी ही पावलं उचलल्याचे पक्षाने सांगितले आहे. हरिप्रसाद यांनी सांगितले की, खबरदारीचा उपाय म्हणून हैदराबादमध्ये एक रिसॉर्ट बुक केला आहे. कारण भाजपा ऑपरेशन लोट्स राबवू शकते.
भाजपाच्या एका नेत्याने प्लॅन बी तयार आहे, असंही सांगितलं आहे. भाजपाने दोन वेळा आमदार फोडून सरकार स्थापन केलं आहे. त्यामुळे भाजपा पुन्हा तोडफोड करू शकते, ही भीती खरी आहे.
दरम्यान, बी. के. हरिप्रसाद यांनी कर्नाटकमधील विजयाचं कारणंही सांगितलं. ते म्हणाले, राहुल गांधी यांचं सदस्यत्व जाणं हा कर्नाटकच्या निवडणुकीत निर्णायक मुद्दा ठरला. कर्नाटकच्या लोकांना मुर्ख बनवता येणार नाही. बजरंगबली आणि बजरंग दल यांच्यातील फरक लोकांना समजतो. बजरंग बल आमचे दैवत आहेत. तर बजरंग दलाकडे लोक एक राजकीय संघटन म्हणून पाहतात. त्यामुळे खूप मोठा फरक पडला नाही. किनारी भागात त्याचा थोडासा परिणाम जाणवला.
कर्नाटकमध्ये आतापर्यंत समोर आलेल्या कलांमध्ये काँग्रेसने १३४ जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजपा केवळ ६४ जागांवर आघाडीवर आहे. जे़डीएस २२ जागांवर आघाडीवर आहे. तर इतर ४ जागांवर आघाडीवर आहेत.