बेंगळुरु: कर्नाटकात मतमोजणीच्या सुरुवातीच्या काळात भाजपा स्पष्ट बहुमतासह सत्तेत येईल अशी शक्यता वाटत होती. मात्र भाजपा १०४ जागांवरच जाऊन थांबल्यामुळे स्पष्ट बहुमतासाठी ८ जागा भाजपाला कमी पडत असल्याचे स्पष्ट झाले. यामुळेच काँग्रेस आणि जदसे यांनी सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरु केल्या.कालच्या मतांच्या आकडेवारीकडे पाहिले तर भाजपा काही जागांवर निसटत्या मतांनी पराभूत झाल्याचे दिसून येते. किमान १० जागांवर भाजपाचा ३००० पेक्षा कमी मतांनी पराभव झाला आहे. या जागांवर जरा जास्त लक्ष दिले असते तर येथे भाजपाला विजय मिळवता आला असता. असे घडले असते, तर कर्नाटकच्या नव्या सरकारच्या स्थापनेचे नाटक लांबले नसते. रायचूर जिल्ह्यात मास्की येथे भाजपाच्या बसण्णागौडा तुर्वीहाळ यांचा केवळ २१३ मतांनी पराभव झाला आहे. येथे काँग्रेसचे प्रतापगौडा पाटील विजयी झाले. त्याबरोबरच सहा जागांवर भाजपाचा २००० पेक्षा कमी मतांनी पराभव झाला आहे. या जागा भाजपाला कदाचित सत्तेच्या जवळ घेऊन गेल्या असत्या. चिकमगळूर जिल्ह्यातील श्रृंगेरी मतदारसंघात विजयी होण्याचा भाजपाला पूर्ण विश्वास होता मात्र तेथे डी. एन. जीवराज यांना पराभव स्वीकारावा लागला. तसेच सीमाभागात अथणी येथेही लक्ष्मण सवदी विजयी होतील अशी भाजपाला खात्री होती. मात्र तेथेही भाजपाचा निसटता पराभव झाला. खुद्द बदामीमध्येही काँग्रेसचा कसाबसा विजय झाला. चामुंडेश्वरी मतदारसंघात पराभूत झालेल्या मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना बदामीने आधार दिला. त्यामुळे त्यांची आमदारकी कायम राहिली. भाजपाच्या बी. श्रीरामलू यांनी सिद्धरामय्या यांना कडवी लढत दिली. मात्र अखेर अटीतटीच्या लढतीत सिद्धरामय्या यांचा विजय झाला.
Karnataka election results 2018: ...तर भाजपाला कर्नाटकमध्ये बहुमत मिळालं असतं
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2018 10:19 AM