बेंगळुरूः सत्ताधारी काँग्रेस आणि भाजपासाठी अत्यंत प्रतिष्ठेच्या झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत अपेक्षेप्रमाणेच 'काँटे की टक्कर' पाहायला मिळतेय. सुरुवातीच्या कलांमध्ये आघाडी घेणारा काँग्रेस आता पिछाडीवर पडल्याचं चित्र आहे. वृत्तवाहिन्यांवरील कल पाहता, भाजपाची वाटचाल 'शंभरी'च्या दिशेनं सुरू आहे. हाच कल कायम राहिला तर, कर्नाटकातही 'कमळ' उमलू शकतं. अर्थात, अजून तरी स्पष्ट बहुमत कुठल्याच पक्षाला मिळताना दिसत नाहीए. त्यामुळे जेडीएस किंगमेकर होईल, हा सर्वच एक्झिट पोलचा अंदाज तंतोतंत खरा ठरणार आहे.
कर्नाटक विधानसभेच्या २२४ पैकी २२२ जागांसाठी १२ मे रोजी मतदान झालं होतं. या निवडणुकीची मतमोजणी सकाळी आठ वाजता सुरू झाली. बॅलेटद्वारे आलेल्या मतांची मोजणी सुरुवातीला करण्यात आली. त्यानंतर, ईव्हीएम मशीन उघडली गेली आणि काँग्रेसचा 'हात उंचावला'. त्यांच्या तुलनेत भाजपा मागे पडली होती. पण साधारण अर्ध्या-पाउण तासानंतर भाजपाने मुसंडी मारली आणि कमळाच्या पाकळ्या हळूहळू उमलू लागल्या.
सकाळी ९.३० वाजताचं चित्र पाहता, भाजपानं नव्वदी ओलांडली आहे, तर काँग्रेस ऐंशीच्या घरात दिसतेय. जेडीएसचं भाग्य फळफळलं असून त्यांनीही चाळिशी गाठली आहे. हे आकडे बदलूही शकतात, पण स्पष्ट बहुमतापर्यंत काँग्रेस किंवा भाजपा पोहोचू शकेल असं दिसत नाही. त्यामुळे कर्नाटकचा किंग ठरवण्याचं काम माजी पंतप्रधान एचडी देवेगौडाच करतील, असं म्हणता येईल.
दरम्यान, कर्नाटक विधानसभेची निवडणूक काँग्रेससाठी अस्तित्वाची लढाई आहे, तर केंद्रातील मोदी सरकारचं मूल्यमापनही या निवडणुकीच्या माध्यमातून होणार आहे. पुढच्या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणूनही तिच्याकडे पाहिलं जातंय.