बंगळुरु : कर्नाटकच्या जनतेने विधानसभा निवडणुकीत त्रिशंकू कौल दिल्यानंतर आता सरकार कुणाचे बनणार आणि मुख्यमंत्री कोण होणार याची उत्सुकता संपूर्ण देशात होती, मात्र बुधवारी नाटयमय वळणानंतर राज्यपालांनी सरकार स्थापनेसाठी भाजपला निमंत्रण दिले असून, उद्या सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी येडियुरप्पा राज भवन, ग्लास हाऊस येथे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. त्यामुळं कर्नाटकात सरकार स्थापन करण्यावरून सुरू असलेल्या राजकीय संघर्षाला पूर्णविराम मिळाला आहे. उद्या सकाळी भाजपाचे येडियुरप्पा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. राज्यपालांनी तसे आमंत्रण दिल्याचे भाजपाने स्पष्ट केल्यानंतर काँग्रेसने पत्रकार परिषद घेत त्यावर टीका केली. राज्यपालांच्या निर्णयामुळे कोर्टाचा अवमान झाल्याची भावना काँग्रेसने व्यक्त केली आहे.
येडियुरप्पा यांच्या शपथविधी कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकामध्ये सुरक्षा यंत्रणेला सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पोलिस महासंचालकांनी पोलिस दलाला तयार राहण्याचे आदेश दिले आहेत. दुसरीकडे काँग्रेस नेते सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या निवास्थानी त्यांची भेट घेण्यासाठी पोहचले आहेत. त्यांच्या या भेटीमागिल उद्देश कर्नाटकमध्ये सत्तास्थापनेचा निर्णय आजच रात्री घेण्याचा आहे.
भाजपच्या सर्व आमदारांना व महत्वपूर्ण नेत्यांना बंगळुरूत दाखल होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शपथविधीची तयारी भाजपच्या गोटात सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस व जेडीएसतर्फे धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर पोलिस महासंचालकांनी सुरक्षा यंत्रणेला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.