मुंबई : सर्वांचे लक्ष लागलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल आता जवळपास स्पष्ट झाला आहे. अंतिम आकडेवारी अजून समोर आली नसली तरी भाजपने मुंसडी मारत जोरदार आघाडी घेतली आहे. भाजपने आणखी एक राज्य काबिज केल्याने सोशल मीडियातून भाजपचं कौतुक केलं जातंय तर कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर शेरेबाजी केली जातीये. वेगवेगळ्या प्रतिक्रिया सोशल ट्विटरवर बघायला मिळत आहेत.
कर्नाटक विधानसभेच्या २२४ पैकी २२२ जागांसाठी १२ मे रोजी मतदान झालं होतं. या निवडणुकीची मतमोजणी सकाळी आठ वाजता सुरू झाली. बॅलेटद्वारे आलेल्या मतांची मोजणी सुरुवातीला करण्यात आली. त्यानंतर, ईव्हीएम मशीन उघडली गेली आणि काँग्रेसचा 'हात उंचावला'. त्यांच्या तुलनेत भाजपा मागे पडली होती. पण साधारण अर्ध्या-पाउण तासानंतर भाजपाने मुसंडी मारली आणि कमळाच्या पाकळ्या हळूहळू उमलू लागल्या.