बेंगळुरूः कर्नाटक विधानसभेत बहुमताचा आकडा गाठता आला नसतानाही, भाजपाने सत्तास्थापनेचा दावा केला आहे. इतकंच नव्हे तर, भाजपाचे विधिमंडळ नेते म्हणून नियुक्ती झाल्यानंतर, बीएस येडियुरप्पा यांनी उद्याच मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचा निर्धार व्यक्त केलाय. त्यांचा हा आत्मविश्वास पाहून सगळ्यांच्याच भुवया उंचावल्यात. मात्र, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आखलेली रणनीती यशस्वी झाल्यास ते काँग्रेस-जेडीएसला नक्कीच धक्का देऊ शकतील, असं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे.
कर्नाटकात सत्तास्थापनेसाठी भाजपाने दोन 'प्लॅन' तयार केलेत. बहुमत सिद्ध करताना, काँग्रेस आणि जेडीएसचे १५ आमदार गैरहजर राहतील, यासाठी त्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तसं झाल्यास, विधानसभेचं संख्याबळ २२२ वरून २०७ वर येईल आणि भाजपा १०४ आमदारांच्या जोरावर सरकार स्थापन करू शकेल.
भाजपाचं दुसरं अस्त्र आहे, ते लिंगायत सन्मानाचा मुद्दा. काँग्रेस आणि जेडीएसच्या लिंगायत आमदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी त्यांनी जोर लावला आहे. भाजपाच्या नेत्यांनी लिंगायत मठांशीही संपर्क साधल्याचं कळतं. काँग्रेसच्या २१ आणि जेडीएसच्या १० लिंगायत आमदारांनी येडियुरप्पांना पाठिंबा द्यावा, यासाठी त्यांच्यावर भावनिक दबाव आणण्याचा ते प्रयत्न करत आहेत. त्यात त्यांना निम्मं यश मिळालं तरी त्यांना सत्तासुंदरी प्रसन्न होऊ शकते. अर्थात, ही जुळवाजुळव तितकीशी सोपी नाही.
काँग्रेस-जेडीएसचे आमदार आमच्या संपर्कात असून भाजपाच सरकार स्थापन करेल, असा विश्वास येडियुरप्पा यांनी व्यक्त केला. त्यानंतर, भाजपानं आपल्या आमदारांना १०० कोटी आणि मंत्रिपदाची ऑफर दिल्याचा आरोप करत जेडीएस नेते कुमारस्वामींनी खळबळ उडवून दिली. या शाब्दिक चकमकींनंतर, काँग्रेस आणि जेडीएस नेते ११३ आमदारांच्या समर्थनाचं पत्र घेऊन राज्यपालांच्या भेटीला गेले. स्थिर सरकार देऊ शकू इतकं संख्याबळ आपल्याकडे असल्याचा दावा मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार कुमारस्वामी यांनी केला आहे. भाजपाला झुकतं माप मिळण्याची चिन्हं असल्यानं जेडीएस कार्यकर्त्यांनी राज्यपाल भवनाबाहेर निदर्शनं, घोषणाबाजी सुरू केली आहे. कर्नाटकातील हे सगळं राजकीय नाटक किती काळ सुरू राहतं आणि त्याचा शेवट काय होतो, याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता आहे.