बंगळुरु: भाजपाकडून जेडीएसच्या काही आमदारांना 100 कोटींची ऑफर दिली जात असल्याचा खळबळजनक आरोप जेडीएसचे नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी केला. सत्ता स्थापनेसाठी भाजपाला पाठिंबा द्यावा, यासाठी जेडीएसच्या आमदारांना 100 कोटी आणि कॅबिनेट मंत्रिपदाची ऑफर देण्यात येत आहे. हा काळा पैसा येतो कुठून? आता आयकर विभागाचे अधिकारी कुठे आहेत?, असे प्रश्न कुमारस्वामी यांनी पत्रकारांशी संवाद साधताना उपस्थित केले.
कुमारस्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही शरसंधान साधलं. बहुमत पाठिशी नसतानाही आम्ही कर्नाटकवर राज्य करू, असं विधान पंतप्रधानांनी करणं चुकीचं असल्याचं त्यांनी म्हटलं. 'मलादेखील भाजपानं ऑफर दिली आहे. जेडीएस भाजपासोबत गेल्यास दोन्ही पक्षांच्या आमदारांची एकूण संख्या 140 वर जाईल. मात्र त्यामुळे देशाच्या धर्मनिरपेक्ष प्रतिमेला तडा जाईल,' असंही ते म्हणाले. 'भाजपनं आमचे आमदार फोडण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही त्यांचे दुप्पट आमदार फोडू. त्यांचे किमान 15 आमदार आम्ही फोडू शकतो,' असं थेट आव्हान कुमारस्वामी यांनी दिलं.
'माझ्या वडिलांनी 2004 आणि 2005 मध्ये भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय माझ्या वडिलांच्या राजकीय कारकिर्दीवरील काळा डाग आहे. आता परमेश्वरानं मला ती चूक सुधारण्याची संधी दिली आहे,' असं कुमारस्वामी यांनी म्हटलं. 'माझे वडिल आणि जेडीएसचे अध्यक्ष देवेगौडा 1998 मध्ये भाजपाच्या पाठिंब्यानं पंतप्रधान झाले. मात्र याबद्दल त्यांना नंतर पश्चाताप झाला. आता मलाही भाजपाकडून ऑफर आहे. मी याबद्दल कोणतीही गोष्ट लपवणार नाही. मात्र माझ्या वडिलांना वाईट वाटेल, असं मी काहीही करणार नाही,' असं म्हणत भाजपासोबत जाणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.