Karnataka Election Results : 'असं' असेल कर्नाटकमधील सत्तेचं समीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2018 04:36 PM2018-05-15T16:36:44+5:302018-05-15T16:36:44+5:30
सध्या कर्नाटकमध्ये त्रिशंकू स्थिती
बंगळुरु: भाजपानं कर्नाटकमध्ये शानदार विजय मिळाला आहे. मात्र त्यांना बहुमताचा आकडा गाठण्यात अपयश येताना दिसतं आहे. त्यामुळे आता कर्नाटकमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेस दुसऱ्या क्रमांकाचा, तर जेडीएस तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. त्यामुळे सर्वच पक्ष सध्या सत्ता स्थापन करण्यासाठी जुळवाजुळव करताना दिसत आहेत.
सत्तेचे समीकरण - 1: धर्मनिरपेक्षतेचा मुद्दा, काँग्रेस-जनता दल सरकार
अनेक वृत्तवाहिन्यांनी त्रिशंकू विधानसभेची शक्यता वर्तवली होती. कर्नाटकमधील स्थिती तशीच काहीशी होताना दिसते आहे. भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरत असला, तरी त्यांच्याकडे बहुमत नाही. त्यामुळे काँग्रेस आणि जेडीएस एकत्र येऊन सत्ता स्थापन करु शकतात. काँग्रेसनं त्यासाठी जेडीएसला पाठिंबादेखील दिला आहे. जेडीएसपेक्षा मोठा पक्ष असूनही काँग्रेसनं मुख्यमंत्रिपद सोडण्याची तयारी दर्शवली आहे. काँग्रेसची ही खेळी यशस्वी ठरल्यास त्यांना भाजपाला सत्तेपासून दूर ठेवता येईल.
सत्तेचे समीकरण - 2: भाजपा-जेडीएस युती
पुढील निवडणूक आणि सत्ताधारी पक्षासोबत राहण्याचे फायदे लक्षात घेता जेडीएस भाजपासोबत जाऊ शकतो. काँग्रेसनं जेडीएसला मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली आहे. भाजपा जवळपास शंभरहून अधिक जागा जिंकत असल्यानं त्यांच्याकडून जेडीएसला मुख्यमंत्रीपद दिलं जाणार नाही. मात्र भाजपाकडून जेडीएसला महत्त्वाची मंत्रिपदं दिली जाऊ शकतात. याशिवाय भाजपा केंद्रात सत्तेत असल्यानं जेडीएसला दिल्लीतदेखील फायदे मिळू शकतात. भाजपासोबत गेल्यास त्याचा फायदा जेडीएसला पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीतही होऊ शकतो.
सत्तेचे समीकरण - 3: भाजपा सत्तेत, काही आमदार अनुपस्थित
भाजपाला सत्ता स्थापन करायची असल्यास छोटे पक्ष आणि अपक्ष यांची मदत घेता येऊ शकते. यासाठी काही आमदारांना बहुमत सिद्ध करतेवेळी अनुपस्थित राहण्याची विनंती भाजपाकडून केली जाऊ शकते. आठ ते दहा आमदार अनुपस्थित राहिल्यास बहुमताचा आकडादेखील कमी होईल. त्यामुळे भाजपाला सत्ता स्थापन करता येऊ शकेल.