बेंगळुरूः कर्नाटकसारखं मोठं राज्य 'हात'चं जाऊ नये यासाठी काँग्रेसच्या चाणक्यांनी सत्तेचं नवं गणित मांडलं आहे. जनता दल (धर्मनिरपेक्ष)चे प्रदेशाध्यक्ष कुमारस्वामी यांना काँग्रेसनं मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली असून भाजपाला रोखण्यासाठी त्यांनी मोठी खेळी केली आहे. जेडीएसनंही त्यांची ही ऑफर मान्य केल्याचं सूत्रांकडून समजतं. त्यामुळे पुढचे दोन दिवस कर्नाटकात राजकारण रंगण्याची चिन्हं आहेत.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालात भाजपानं जोरदार मुसंडी मारून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. ते ११२ या 'मॅजिक फीगर'च्या अगदी जवळ जाऊन पोहोचलेत. त्यामुळे बहुमतासाठी आवश्यक असलेल्या पाच-सात जागांची जुळवाजुळव ते सहज करतील, असं चित्र आहे. त्यामुळे देशभरातील भाजपा कार्यालयांमध्ये विजयोत्सवही साजरा केला जातोय.
मात्र, भाजपाला स्पष्ट बहुमत मिळत नाहीए हे पाहून, काँग्रेसनं आपल्या आणि जेडीएसच्या जागांची बेरीज केली आणि कुमारस्वामींना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली. काँग्रेस ७२ जागांच्या जवळपास असून, जेडीएस चाळिशी गाठतोय. त्यामुळे बहुमताचा आकडा गाठणं त्यांना शक्य होतंय.
काँग्रेसचे सरचिटणीस गुलाम नबी आझाद यांनी पत्रकारांशी बोलताना, भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्याचा आपल्या पक्षाचा अजेंडा स्पष्ट शब्दात मांडला. ते म्हणाले, आम्ही देवेगौडा आणि कुमारस्वामी यांच्याशी बोललो. आम्ही त्यांच्या पक्षाच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापनेचा प्रस्ताव दिला आहे. त्या सरकारचे नेतृत्व कोण करेल ते देवेगौडा ठरवतील. आमचा प्रस्ताव त्यांनी स्वीकारला आहे. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी जनता दलाला पाठिंबा देण्यास आणि मुख्यमंत्रिपदही त्यांना देण्यास सिद्धरामय्या यांनीही मान्यता दिल्याचं आझाद यांनी स्पष्ट केलं.
काँग्रेसच्या या ऑफरमुळे कर्नाटकात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सिद्धरामय्या दुपारी चार वाजता राज्यपालांची भेट घेणार आहेत. आता, काँग्रेसला काटशह देण्यासाठी भाजपा काय खेळी करतो याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय.