बेळगावः कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीकडे देशाचं लक्ष लागलं असताना, महाराष्ट्रातील मंडळी बेळगावकडे डोळे लावून बसली होती. सीमाभागातील मराठी माणसांचा आवाज कर्नाटक विधानसभेत पुन्हा घुमणार का, याबद्दल त्यांना उत्सुकता होती. परंतु, त्यांच्या पदरी साफ निराशा पडली आहे. कारण, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या चार उमेदवारांपैकी एकही शिलेदार आघाडीवर नसल्याचं चित्र आहे.
बेळगाव उत्तर, बेळगाव दक्षिण, बेळगाव ग्रामीण आणि खानापूर या चार मराठीबहुल मतदारसंघांमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीची ताकद आहे. गेल्या निवडणुकीत बेळगाव दक्षिण आणि खानापूर या दोन जागा त्यांनी जिंकल्या होत्या. बेळगाव ग्रामीणमध्ये मनोहर किणेकर यांना थोडक्यात पराभव पत्करावा लागला होता. त्यांना बंडखोरीचा फटका बसला होता. त्यातून बोध घेऊन, यावेळी सर्वजण एकत्र येऊन निवडणूक लढवतील, अशी आशा होती. पण, यावेळी पुन्हा एकदा मराठी विरुद्ध मराठी अशी लढाई झाली आणि त्यात सीमाभागातील मराठी माणूस पोरका झाला आहे.
महाराष्ट्र एकीकरण समितीचे अरविंद पाटील खानापूरमधून पुढे होते. परंतु, नंतर तेही पिछाडीवर पडले आणि मराठी माणसाच्या उरल्यासुरल्या आशाही मावळल्या. किरण ठाकूर यांची शहर एकीकरण समिती आणि दीपक दळवींची मध्यवर्ती एकीकरण समिती आमनेसामने उभे ठाकल्याने मराठी माणसाचं नुकसान झालंय.
बेळगावातील १८ जागांपैकी १० जागांवर काँग्रेस पुढे आहे, तर भाजपा ८ जागांवर आघाडीवर आहे. त्याचवेळी, भाजपा कर्नाटकात स्वबळावर सत्ता स्थापन करेल असं चित्र आहे. त्यांनी ११० चा आकडा ओलांडल्यानं आश्चर्य व्यक्त होतंय. काँग्रेसची पार घसरगुंडी झाली असून जेडीएसचं किंगमेकर होण्याचं स्वप्नही धुसर झालंय.