बंगळुरु- सामान्य नोकरदाराची वर्षभरात अगदी 10 ते 20 टक्क्यांनी पगारवाढ होत असते. पाच वर्षांमध्ये पुर्वीच्या पगाराच्या फारतर 60 ते 70 टक्के वाढ साधण्यापर्यंत नोकरदारांची मजल जाते. उद्योजकांच्या पगारात त्याहून वेगाने वाढ होते. पण कर्नाटकातील एका राजकीय नेत्याच्या संपत्तीत गेल्या पाच वर्षांमध्ये झालेली वाढ पाहिली तर तुम्हाला प्रचंड धक्का बसेल.कर्नाटकचे मंत्री आणि काँग्रेसचे राज्यातील महत्त्वाचे नेते म्हणून ओळखले जाणारे डी. के. शिवकुमार यांच्या संपत्तीमध्ये पाच वर्षांमध्ये 589 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. या शिवकुमार यांनी गेल्या वर्षी राज्यसभा निवडणुकीच्या वेळेस गुजरातमधील काँग्रेसच्या 43 आमदांरा आश्रय देत त्यांचा सर्व खर्च उचलला होता. 2013 साली त्यांनी आपली संपत्ती 251 कोटी रुपये असल्याचे जाहीर केले होते तर आता ती 840 कोटी असल्याचे आपल्या निवडणूक अर्जाबरोबर जाहीर केले आहे.डी. के. शिवकुमार हे कर्नाटकामध्ये डीके नावाने ओळखले जातात. वक्कलिंग समाजाचे वजनदार नेते म्हणून त्यांची ओळख आहेच त्याहून देवेगौडा कुटुंबाला टक्कर देण्याची क्षमता असणारा कॉंग्रेसचा नेता असा लौकिक त्यांनी पक्षात मिळवलेला आहे. 1985 साली डी.के शिवकुमार पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले तेच मुळी एच. डी. देवेगौडा यांच्याविरोधात. सतनूर मतदारसंघात देवेगौडांनी पराभूत केले. पण देवेगौडा तेव्हा होळेनरसिंहपूर मतदारसंघातूनही निवडून गेल्याने त्यांनी ही जागा रिकामी केली. त्यामुळे सतनूरला पोटनिवडणूक घेतल्यानंतर शिवकुमार यांचा विजय झाला. 1989 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत देवेगौडांनी त्यांचा पुन्हा पराभव केला. तर 1994 साली एच.डी. कुमारस्वामी यांच्याकडून शिवकुमारना पराभव सहन करावा लागला. असं असलं तरी शिवकुमार यांनी पक्षामध्ये आणि कर्नाटकात राजकीय नेता म्हणून चांगलाच जम बसवायला सुरुवात केली होती. कॉंग्रेसमध्ये वरिष्ठ नेत्यांमध्ये त्यांचं नाव घेतलं जाऊ लागलं.
2013 साली कनकपुरा मतदारसंघात झालेल्या निवडणुकीत त्यांनी जेडीएसचे पी.जी. सिंदिया यांना पराभूत करुन पुन्हा विधानसभेत प्रवेश केला आणि ऊर्जामंत्रीपद पटकावलं. त्यांचे बंधु डी. के. सुरेश बंगळुरु ग्रामिण मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले आहेत तर त्यांचा चुलतभाऊ एस. रवी कर्नाटक विधानपरिषदेचे सदस्य आहे. शिवकुमार देशातील श्रीमंत राजकीय नेत्यांपैकी एक मानले जातात. 2013 साली निवडणुकीत अर्ज भरताना त्यांनी आपली संपत्ती 251 कोटी असल्याचे जाहीर केले होते, 2008 साली ती 176 कोटी रुपये इतकी होती. पाच वर्षांमध्ये इतक्या वेगाने संपत्ती वाढल्याचे पाहून सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले होते. आता तर त्यांनी स्वतःचे सर्व विक्रम मोडत 840 कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली आहे.