कर्नाटकमधील विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यास आता काही तासांचा अवधी उरला आहे. दरम्यान, एक्झिट पोलमधून काँग्रेसची सत्ता येण्याचे संकेत मिळाल्याने काँग्रेसच्या गोटात आनंदाचं वातावरण आहे. मात्र खबरदारी म्हणून काँग्रेस आणि जेडीएसमध्ये चर्चा सुरू असल्याचेही वृत्त येत आहे. दरम्यान, काँग्रेसचे नेते डी.के.शिवकुमार यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. काँग्रेस निकालांमध्ये बहुमत मिळवेल आणि सरकार बनवेल. त्यात कुठलीही शंका बाळगण्याची गरज नाही. असे त्यांनी सांगितले.
आम्हाला विश्वास आहे की काँग्रेस बहुमतासह सरकार बनवेल. जेडीएस काय बोलत आहे, यावर प्रतिक्रिया देण्याची गरज नाही. यावेळी जेडीएस किंगमेकर ठरणार नाही. तसेच काँग्रेसही जेडीएससोबत कुठलीही चर्चा करत नाही आहे. आता भाजपा आणि जेडीएसमध्ये काय बोलणं सुरू आहे, याची आम्हाला माहिती नाही. निवडणुकीनंतरच्या बॅकअप प्लॅनबाबत म्हणाल तर काँग्रेस पक्ष त्यावर विचार करत नाही आहे. कारण आम्हाला बहुमत मिळेल, असा आम्हाला विश्वास आहे. निवडणुकीनंतर काँग्रेस पक्षाकडून मुख्यमंत्री म्हणून कुणाची निवड होईल, याचा निर्णय सोनिया गांधी, राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गै यांना करायचा आहे, असेही डी. के. शिवकुमार यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, कर्नाटकमध्ये कुणाचं सरकार येणार याचा निर्णय १३ मे रोजी होणार आहे. मात्र एक्झिट पोलमध्ये आघाडी मिळाल्यानंतर काँग्रेसमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. दिल्लीपासून बंगळुरूपर्यंत काँग्रेसचे सर्व नेते पूर्ण बहुमतासह सरकार स्थापन करण्याचा दावा करत आहेत. तर भाजपा नेते एक्झिट पोल चुकीचे ठरतील असा दावा करत आहेत. शनिवारी मतमोजणीत कमाल होईल आणि कर्नाटकमध्ये पुन्हा कमल उमलेल, असा विश्वास भाजपाला आहे.