नवी दिल्ली - कर्नाटक निकालानंतर राजधानी दिल्लीत मुख्यमंत्रिपदासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. मुख्यमंत्री कोण होणार सिद्धरामय्या की डी. के. शिवकुमार? यावर आता चर्चा होऊ लागली आहे.
पक्षाचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या आमदारांमध्ये लोकप्रिय आहेत तसेच राहुल गांधी यांच्या पसंतीचे मानले जातात. दुसरे वरिष्ठ नेते डी. के. शिवकुमार मल्लिकार्जुन खरगे यांच्या खास मर्जीतील आहेत. त्यात प्रियांका गांधी यांचेही आशीर्वाद शिवकुमार यांच्या पाठीशी आहेत. काँग्रेस महासचिव व कर्नाटकचे प्रभारी रणदीप सुरजेवाला यांचाही या विजयात मोठा वाटा आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदासाठी निवड करताना सुरजेवाला यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. पक्षात अशीही चर्चा आहे की, मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित करताना राजधानीतील पक्षाचे वरिष्ठ नेते आणि विशेषत: राहुल गांधी यांच्याच निर्णयावर रणदीप सुरजेवाला यांच्याकडून शिक्कामोर्तब केले जाईल. तसेच मुख्यमंत्रिपदासाठी निवड करताना पक्षाचे अध्यक्ष या नात्याने खरगे यांचीही भूमिका महत्त्वाची असणार आहे. काँग्रेस आमदारांची आज बैठकविजयी झालेल्या काँग्रेस उमेदवारांना तातडीने बंगळुरूला बोलाविण्यात आले आहे. नव्याने निवडून आलेल्या या आमदारांची उद्या, रविवारी बैठक बोलाविण्यात आली असून, त्यात विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड करण्यात येईल, असे काँग्रेस पक्षाच्या सूत्रांनी सांगितले.