नवी दिल्ली: काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. भाजपकडून यावर तीव्र प्रतिक्रियाही उमटत आहेत. केंद्रीय मंत्री, कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि भाजपच्या इतर नेत्यांनी खर्गेंवर टीका केली आहे. कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच भाजप नेते काँग्रेसला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत.
काय म्हणाले खर्गे ?मल्लिकार्जुन खर्गे कलबुर्गी येथे एका निवडणूक सभेला संबोधित करत होते. यावेळी ते म्हणाले की, पंतप्रधान मोदी हे विषारी सापासारखे आहेत. तुम्हाला प्रश्न पडेल की, ते विष आहे की नाही. पण, तुम्ही त्याचा स्वाद घेतला तर तुम्ही मराल, असे खर्गे म्हणाले. यानंतर त्यांनी आपल्या वक्तव्यावर खुलासाही केला. ते म्हणाले की, मी पंतप्रधान मोदी आणि आरएसएसच्या विचारधारेबद्दल काही बोलत होतो.
खर्गेंच्या विधानानंतर भाजप नेत्यांची टीका
- केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी हुबळी येथे बोलताना म्हटले की, आज काँग्रेस कोणत्या प्रकारचे विष ओकत आहे, हे देश पाहत आहे. काँग्रेस नेत्याने पंतप्रधान मोदींवर अपमानास्पद टिप्पणी करण्याची ही पहिलीच वेळ नाही. अशा शेरेबाजीने त्यांनी कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसचा पराभव निश्चित केला आहे. हे शब्द खर्गे यांचे असतील, पण हे विष गांधी घराण्याचे आहे.
- केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, निवडणुकीत वारंवार होणारा पराभव आणि कुठेतरी काँग्रेसचा रोष यामुळे मोदींचा अपमान करणे आणि त्यांना शिवीगाळ करणे ही काँग्रेसची मजबुरी बनते. सोनिया गांधींपासून ते त्यांच्या अध्यक्षांपर्यंत कधी मोदीजींना मृत्यूचे व्यापारी म्हणतात, कधी विंचू म्हणतात, कधी साप म्हणतात. काँग्रेसला देशाची माफी मागावी लागेल, अन्यथा कर्नाटकची जनता त्यांचा जामीन जप्त करून त्यांना चोख प्रत्युत्तर देईल.
- केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी बंगळुरूमध्ये म्हटले की, खर्गे यांच्यासारख्या अनुभवी व्यक्तीने हा शब्द उच्चारने दुर्दैवी आहे. ज्या पक्षातील ते आआहेत, त्या पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी पंतप्रधानांना मृत्यूचे व्यापारी म्हणाल्या होत्या. असे शब्द लोकशाहीत मान्य नाहीत. खर्गे जी यांची काही तरी मजबुरी असावी, असे आम्हाला वाटते. त्यांनी आपल्या साहेबांना संतुष्ट करण्यासाठी असे शब्द वापरले आहेत.
- अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, मल्लिकार्जुन खर्गे यांचे असे वक्तव्य काँग्रेसची मानसिकता दर्शवते. एकीकडे राहुल गांधी प्रेमाचे दुकान उघडण्यासाठी भारत जोडो यात्रा करतात आणि त्यांच्याच पक्षाचे अध्यक्ष देशाच्या पंतप्रधानांसाठी असे शब्द वापरत आहेत.
- केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले की, जनता त्यांना धडा शिकवेल. मल्लिकार्जुन खर्गे यांनी बिनशर्त माफी मागावी. पंतप्रधानपद हा गांधी घराण्याचा अधिकार आहे, असे त्यांना वाटते. ते (मल्लिकार्जुन खर्गे) गांधी घराण्याशी निष्ठा दाखवण्यासाठी अशा गोष्टी बोलतात.
- कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी हावेरी येथे खर्गे यांच्या वक्तव्यावर जोरदार प्रहार केला. ते म्हणाले की, खर्गे यांच्या मनात विष आहे. ते पंतप्रधान मोदी आणि भाजपबद्दल पूर्वग्रहदूषित आहेत. या प्रकारचा विचार निराशेतून बाहेर पडतो, कारण ते त्यांच्याशी राजकीयदृष्ट्या लढू शकत नाहीत आणि त्यांना त्यांचे जहाज बुडताना दिसत आहे.