बंगळुरू : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. 224 जागांपैकी 222 जागांसाठी मतदार मतदानाचा हक्क बजावत आहेत. काँग्रेस, भाजपा आणि जनता दल सेक्यूलर अशी तिरंगी लढत याठिकाणी पाहायला मिळत आहे. भाजपासाठी कर्नाटकामध्ये विजय मिळवणे महत्त्वाचे असून, दुसरीकडे येथील सत्ता कायम राखण्याचे आव्हान काँग्रेससमोर आहे. संपूर्ण देशाचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. भाजपाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार बी.एस.येडीयुरप्पा यांनीदेखील मतदान केले. मतदानापूर्वी येडीयुरप्पा यांनी घरामध्ये देवाची पूजा केली. त्यानंतर घराजवळील एका मंदिराचे दर्शन घेतले.
यावेळी, प्रसिद्धी माध्यमांसोबत संवाद साधताना येडीयुरप्पा म्हणाले की, सिद्धरामय्या सरकारमुळे जनता त्रस्त झाली आहे. मात्र, यावेळी जनता आमच्यावर विश्वास दाखवणार आहेत. 150 हून अधिक जागांवर आम्ही विजय प्राप्त करू आणि 17 मे रोजी मी शपथ घेणार, असा विश्वास यावेळी येडीयुरप्पा यांनी व्यक्त केला.