Karnataka Elections 2023: बेळगाव जिल्ह्यात 5 वाजेपर्यंत 66.37 टक्के मतदान
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2023 12:13 PM2023-05-10T12:13:22+5:302023-05-10T17:42:32+5:30
प्रकाश बेळगोजी बेळगाव : देशाचे लक्ष लागून राहिलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेला आज, बुधवारी सकाळी 7 वाजता सुरुवात ...
प्रकाश बेळगोजी
बेळगाव : देशाचे लक्ष लागून राहिलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेला आज, बुधवारी सकाळी 7 वाजता सुरुवात झाली आहे. प्रारंभीच्या सत्रात मतदारांचा फारसा प्रतिसाद नसलेल्या दिसून आले. मात्र त्यानंतर मतदानासाठी मतदारांनी मोठी गर्दी केली होती. दुपारी ३ वाजेपर्यंत जिल्ह्यात 53 टक्के मतदानाची नोंद झाली. तर, 5 वाजेपर्यंत 66.37 टक्के मतदान झाले. सकाळी 9 वाजेपर्यंत पहिल्या सत्रात राज्यात एकूण 8.26 टक्के तर बेळगाव जिल्ह्यात 7.47 टक्के तसेच दुसऱ्या टप्प्यात 22.42 टक्के मतदानाची नोंद झाली होती.
मतदान शांततेने सुरळीत पार पडावे यासाठी प्रत्येक मतदार केंद्र परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. प्रारंभी सकाळी काही अपवाद वगळता उर्वरित सर्व मतदान केंद्राच्या ठिकाणी मतदानासाठी फारशी गर्दी झाली नव्हती. मात्र, 9 नंतर प्रत्येक मतदार केंद्रांवर मतदारांची गर्दी होऊन मोठ्या रांगा लागल्याचे पहावयास मिळाले.
पहिल्या टप्प्यात सौंदत्ती -यल्लमा मतदारसंघात सर्वाधिक मतदान
भारतीय निवडणूक आयोगाच्या सचिवालयाने सकाळी 9:22 वाजता जाहीर केलेल्या जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यातील मतदान टक्केवारीमध्ये सर्वाधिक मतदान सौंदत्ती -यल्लमा मतदारसंघात 11.03 टक्के इतके, तर सर्वात कमी मतदान रामदुर्गमध्ये 4.57 टक्के इतके झाले होते.
काही ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडली
आज सकाळी प्रारंभीच्या सत्रात शहरातील बऱ्याच मतदार संघामध्ये वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे कांही ठिकाणी ईव्हीएम मशीनची मतदान यंत्रणा बंद पडली होती. परिणामी सकाळी लवकर मतदान केंद्राच्या ठिकाणी हजर होऊन उत्साहाने कामाला लागलेल्या निवडणूक कर्मचाऱ्यांवर हताश होऊन वीज पुरवठा केंव्हा सुरू होतो याची वाट पाहण्याची वेळ आली होती. तथापि याबाबतची माहिती मिळताच निवडणूक आयोगाने तात्काळ कार्यवाही करत संबंधित मतदान केंद्रांवरील वीज पुरवठा पुन्हा सुरळीत सुरू होईल याची व्यवस्था केली. एकंदर आज सकाळी 9 वाजल्यानंतर मतदार मोठ्या प्रमाणात मतदानासाठी घराबाहेर पडत असल्याचे दिसून आले.
गेल्या दोन-तीन दिवसापासून दुपारनंतर शहर परिसरात वळीवाची हजेरी लागत असल्यामुळे बऱ्याच मतदारांचा पाऊस येण्यापूर्वी मतदान उरकण्याकडे कल आहे. त्यामुळे आज दुपारी 1 वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणात मतदान होईल असा जाणकारांचा अंदाज आहे.
सकाळी 9 वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी
बेळगाव जिल्ह्यातील 18 मतदारसंघामधील सकाळी 9 वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. निपाणी 6.2 टक्के, चिकोडी -सदलगा 7.72 टक्के, अथणी 9.06 टक्के, कागवाड 8.7 टक्के, कुडची 10.54 टक्के, रायबाग 9.15 टक्के, हुक्केरी 7.17 टक्के, अरभावी 5.41 टक्के, गोकाक 7.94 टक्के, यमकनमर्डी 7.68 टक्के, बेळगाव उत्तर 7.18 टक्के, बेळगाव दक्षिण 5.57 टक्के, बेळगाव ग्रामीण 6.06 टक्के, खानापूर 7.16 टक्के, कित्तूर 6.12 टक्के, बैलहोंगल 6.6 टक्के, सौंदत्ती यल्लमा 11.03 टक्के आणि रामदुर्ग 4.57 टक्के.
दुपारी 3 वाजेपर्यंत जिल्ह्यात 53 टक्के मतदान
बेळगाव ग्रामीण -53.25%, बेळगाव दक्षिण -45.97%, बेळगाव उत्तर -44.18%, खानापूर -53.19
सायंकाळी पाच पर्यंत 66.37 टक्के मतदान
बेळगाव ग्रामीण 68.07%, बेळगाव दक्षिण 57.06%, बेळगाव उत्तर 55.52%, खानापूर 65.02%
काँग्रेस विरुद्ध भाजप लढत
जिल्ह्यातील 18 पैकी कांही मतदार संघात थेट काँग्रेस विरुद्ध भाजप लढत आहे, तर कांही मतदारसंघांमध्ये प्रादेशिक पक्ष आणि अपक्ष यांच्यात कडवी झुंज होईल असा अंदाज आहे. दुसरीकडे बेळगाव आणि खानापूर तालुक्यात राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांसमोर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांनी तगडे आव्हान उभे केले आहे.