बंगळुरू: सध्या कर्नाटकमध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. भाजप आपली सत्ता टिकवण्याचा प्रयत्न करत आहे, तर काँग्रेस सत्तेत येण्यासाठी प्रयत्नशील आहे. यादरम्यान दोन्ही पक्षाचे नेते भ्रष्टाचारासह विविध मुद्द्यांवरुन एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. यातच आता एका काँग्रेस नेत्याच्या भावाच्या घरातून कोट्यवधी रुपये मिळाल्याची माहिती समोर आली आहे.
कर्नाटकातील काँग्रेस नेत्याच्या भावाच्या घरावर आयकर विभागाने आज छापा टाकला. यावेळी आयकर अधिकाऱ्यांना घरातील झाडात लपवून ठेवलेले एक कोटी रुपये आढळले. कर्नाटक काँग्रेसचे नेते अशोक कुमार राय यांचे भाऊ सुब्रमण्यम राय यांच्या म्हैसूर येथील घरावर आयकर अधिकाऱ्यांनी हा छापा टाकला. अशोक कुमार राय हे विधानसभा निवडणुकीत पुत्तूर मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंत्रणा राज्यभर छापे टाकत आहेत. सुब्रमण्यम राय यांच्या निवासस्थानाच्या झडतीचा व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये नोटांनी भरलेला बॉक्स झाडावर लपवलेला दिसत आहे. यावरुन आता भाजपच्या हाती आयते कोलीत लागले आहे. भाजप या घटनेचा मुद्दा बनवणार, यात शंका नाही. दरम्यान, राज्यात आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर एजन्सींनी 110 कोटी रुपयांहून अधिक रोकड जप्त केली आहे. कर्नाटकच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, जप्तीसंदर्भात 2,346 एफआयआर नोंदवण्यात आले आहेत.