कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या प्रचंड यशानंतर आता राजकीय तज्ज्ञांनी या निकालाचे विश्लेषण करण्यास सुरूवात केली आहे. त्यावरून या निवडणुकीत भाजपाचा हिंदुत्त्वाचा अजेंडा यशस्वी ठरल्याचे दिसत आहे. तर दुसरीकडे काँग्रेसने निवडणुकीच्या तोंडावर लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याची खेळी खेळली होती. त्यामुळे लिंगायत समाज काँग्रेसकडे वळेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, आजचे निकाल पाहता लिंगायत समाजाची व्होटबँक भाजपाच्या पाठिशी अभेद्यपणे उभे असल्याचे दिसून आले. लिंगायत समाजाचा प्रभाव असलेल्या तब्बल 37 जागांवर भाजपाला विजय मिळाल्याचे समजत आहे. तर काँग्रेसला 18 आणि जनता दलाला (सेक्युलर) अवघ्या 8 जागांवर समाधान मानावे लागले आहे. तर दोन जागांवर अपक्षांना यश मिळाले. याशिवाय, काँग्रेसचा पारंपारिक मतदार असणाऱ्या मुस्लिम समाजानेही भाजपाला साथ दिल्याचे आश्चर्यकारक चित्र दिसत आहे. आतापर्यंत हाती आलेल्या कलांनुसार, मुस्लिम बहुल भागातील 10 जागांवर भाजपाने आघाडी घेतली आहे. तर काँग्रेसच 8 आणि जनता दल 7 जागांवर आघाडीवर आहे. तर दुसरीकडे वोक्कलिंग समाजाने पुन्हा एकदा देवेगौडा यांच्या जनता दलालाच साथ दिली आहे. वोक्कलिंग समाजाचे प्राबल्य असलेल्या परिसरात जनता दल 20 जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस 9 आणि भाजपा 7 जागांवर आघाडीवर असल्याचे चित्र आहे. याशिवाय, दलितबहुल मतदारसंघांमध्येही भाजपाने 19 जागांवर आघाडी घेतली आहे. तर काँग्रेसला 16 आणि जनता दलाला फक्त 12 जागांवर आघाडी घेता आली आहे.
Karnataka Elections results 2018: भाजपाचा हिंदुत्त्वाचा अजेंडा यशस्वी; लिंगायतांची व्होटबँकही अभेद्य
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2018 11:03 AM