कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मंगळवारी काँग्रेस पक्षाला धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. या ठिकाणी सर्व राजकीय पंडितांचे अंदाज मोडीत काढत भाजपा स्वबळावर सत्ता स्थापन करण्याच्या समीप पोहोचली आहे. या विजयामुळे आता देशातील 22 राज्यांमध्ये भाजपाची सत्ता आली आहे. तर काँग्रेस पक्ष केवळ पंजाब, मिझोराम आणि पाँडिचेरी या राज्यांपुरता उरला आहे. निवडणुकीपूर्वी अनेक एक्झिट पोलमध्ये काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरेल, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. मात्र, काँग्रेसचे हे स्वप्न प्रत्यक्षात येऊ शकले नाही. काँग्रेसच्या पराभवासाठी काही प्रमुख घटक कारणीभूत ठरले. नक्की कोणते आहेत हे घटक, याचा घेतलेला आढावा.
अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर- कर्नाटकमध्ये काँग्रेसची सत्ता असल्यामुळे साहजिकच यावेळी पक्षाविरोधात अँटी-इन्कम्बन्सीची लाट होती. याच अँटी इन्कम्बन्सी फॅक्टरमुळे भाजपाला उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये मोठे यश मिळाले होते. त्रिपुरा, नागालँड, मणिपूर आणि मेघालयमध्येही भाजपला या लाटेचा फायदा मिळाला होता. कर्नाटकमध्येही हीच गोष्ट काँग्रेसच्या पराभवाला कारणीभूत ठरली. याशिवाय, कर्नाटकचा आजपर्यंतचा इतिहास पाहता कोणताही पक्ष सलग दुसऱ्या टर्ममध्ये सत्तेत येऊ शकलेला नाही.
2013 मधील रणनीतीपासून फारकत- भाजपाने यावेळी 2013 पेक्षा वेगळी रणनीती अवलंबिली होती. प्रत्येक प्रचारसभेत भाजपाकडून काँग्रेसवर जोरदार टीका करण्यात आली. भाजपा नेत्यांचा एकूणच पवित्रा आक्रमक होता. 2013 साली रेड्डी बंधू भ्रष्टाचाराच्या आरोपात अडकल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यावेळी भाजपात तीन गट पडले होते. परंतु, या निवडणुकीत हे तिन्ही गट एकत्र आले होते. त्यामुळे भाजपाला मोठा फायदा झाला.पैशांचा वापर- कर्नाटक निवडणुकीपूर्वी 21 राज्यांमध्ये भाजपाची सत्ता होती. याशिवाय, आगामी लोकसभेतही भाजपाच पुन्हा सत्तेत येण्याची चिन्हे अधिक आहेत. त्यामुळे उद्योपगतींसह अन्य देणगीदारांचा ओढा हा भाजपाकडे आहे. त्यामुळे निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेसला आर्थिक कुमक कमी पडल्याची शक्यता अनेकांनी व्यक्त केली.स्वयंसेवकांची फौज- काँग्रेसच्या तुलनेत भाजपाकडे कार्यकर्त्यांची मोठी फौज आहे. यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पद्धतशीरपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचाही समावेश आहे. याचा भाजपाला खूप मोठा फायदा निवडणुकीत झाला.राज्याची पिछेहाट- मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या काळात कर्नाटकचा विकास काही प्रमाणात खुंटला. राज्याचा विकासदरही फारसा वाढला नाही. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भाजपशासित राज्यांतील अनेक लोकप्रिय योजनांची कॉपी केली होती. याशिवाय, लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याची खेळीही सिद्धरामय्या यांनी केली होती. मात्र, यापैकी कोणताही मुद्दा काँग्रेसला निवडणुकीत यश मिळवून देऊ शकला नाही.