बंगळुरू: मणिपूर आणि गोव्याप्रमाणे कर्नाटकमध्ये कोणताही दगाफटका होऊ नये यासाठी काँग्रेसने सोमवारी रात्रीपासूनच आपल्या चाणक्यांना कामाला लावले आहे. विविध मतदानोत्तर चाचण्यांच्या कौलनुसार कर्नाटकात त्रिशंकू स्थिती राहण्याचे भाकित करण्यात आले आहे. तसेच यामध्ये जनता दल (धर्मनिरपेक्ष) अर्थात जेडीएस किंगमेकर ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेसने आकड्यांच्या जुळवाजुळवीकरीता अशोक गहलोत आणि गुलाम नबी आझाद या दोन नेत्यांना कर्नाटकात पाठवले आहे. हे दोन्ही नेते कालच बंगळुरूत दाखल झाले असून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या घरी त्यांची बैठक झाली. या बैठकीत त्रिशंकू परिस्थिती उद्भवल्यास कशाप्रकारच्या वाटाघाटी करायच्या याची रणनीती आखण्यात आल्याची शक्यता आहे. यापूर्वी मणिपूर आणि गोव्यात सर्वात मोठा पक्ष ठरूनही भाजपाच्या राजकीय व्यवस्थापनामुळे काँग्रेसच्या हातातोंडाशी आलेला सत्तेचा घास हिरावला गेला होता. तर दुसरीकडे गुलाम नबी आझाद यांनी भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या कर्नाटकात १३० जागा जिंकण्याचे वक्तव्य खोडून काढले. गुजरातमध्ये त्यांनी १५० जागा मिळतील असे म्हटले होते. मात्र, प्रत्यक्षात त्यांना किती जागा मिळाल्या असा सवाल त्यांनी उपस्थित केला. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी नुकतेच दलित नेत्यासाठी आपण खुर्ची सोडायला तयार असल्याचे म्हटले होते. यावरुन काँग्रेसला निवडणुकीत पूर्ण बहुमत मिळण्याविषयी शंका असल्याचे बोलले जात आहे.
Karnataka Elections results 2018 live: काँग्रेस अनुभवातून शहाणा; मतमोजणीआधीच 'सेटिंग'साठी कर्नाटकात पोहोचले 'चाणक्य'
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2018 8:35 AM