कर्नाटकी पेच कायम; सत्तावाटपाचे सूत्र ठरले, पण डी. के. शिवकुमार अडून बसले! ठेवल्या 2 मोठ्या मागण्या
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2023 06:10 AM2023-05-18T06:10:09+5:302023-05-18T06:10:21+5:30
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार हे दोन मागण्यांवर अडून बसल्याने याबाबत घोषणा होऊ शकलेली नाही.
आदेश रावल -
नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या ऐतिहासिक विजयानंतर आता राज्यातील मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीचा वाद मिटला असला तरी काही पेच कायम आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार हे दोन मागण्यांवर अडून बसल्याने याबाबत घोषणा होऊ शकलेली नाही.
पहिली दोन वर्षे सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्री करावे व त्यापुढील तीन वर्षे डी. के. शिवकुमार यांना मुख्यमंत्री करावे, असा फॉर्म्युला श्रेष्ठींनी तयार केला आहे. यासाठी काँग्रेस नेतृत्वावर विश्वास ठेवण्यास शिवकुमार तयार झाले आहेत. परंतु त्यांना भीती आहे की, सिद्धरामय्या दोन वर्षांनी मुख्यमंत्रिपद सोडतील की नाही? नंतर वाद उद्भवू नये, यासाठी हा फॉर्म्युला आताच जाहीर करावा, अशी अट शिवकुमार यांनी पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी व काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासमोर ठेवली आहे.
शिवकुमार यांची दुसरी मागणी आहे की, उपमुख्यमंत्री २-३ नव्हे, तर केवळ आपल्यालाच करावे. दोन-तीन उपमुख्यमंत्री केले जाण्याची चर्चा असून, ते त्यांना मान्य नाही. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी त्यांना आश्वासन दिले आहे की, तुमची मागणी मान्य केली आहे. तथापि, मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीच्या वाटपाची बाब जाहीर करण्यात येते की नाही, यासाठी शिवकुमार यांचा संघर्ष आहे.
बंद खोलीतील समझोता का नको?
- डी. के. शिवकुमार यांनी छत्तीसगडचे उदाहरण देत म्हटले आहे की, भूपेश बघेल व टी. एस. सिंह देव यांच्यात अडीच-अडीच वर्षांचा समझोता झाला होता.
- परंतु हा समझोता बंद खोलीत झालेला असल्यामुळे भूपेश बघेल यांनी तो मानण्यास नकार दिला. त्यामुळे शिवकुमार यांचे मत आहे की, हा फॉर्म्युला जाहीर करावा.
- परंतु संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी यासाठी इन्कार केलेला आहे. वेणुगोपाल यांचे म्हणणे आहे की, यामुळे काँग्रेस श्रेष्ठी व मुख्यमंत्री पदाची प्रतिष्ठा कमी होईल.
अटी काय?
फॉर्म्युला आताच जाहीर केला पाहिजे
केवळ एकच उपमुख्यमंत्री नेमावा
बंगळुरुमध्ये सिद्धरामय्या यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करण्यास सुरूवात केली आहे.