कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री (Karnataka Former Chief Minister) आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या (Siddaramaiah) यांच्या मोठ्या दाव्यानं कर्नाटकाच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. भारतीय जनता पक्ष (BJP) आणि जनता दल-सेक्युलर (JD-S) चे काही नेते आपल्या संपर्कात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. परंतु त्यांची नावं उघड करण्यास सिद्धरामय्या यांनी नकार दिला. दरम्यान, त्यांची नावं लवकरच जाहीर केली जाऊ शकतील असंही ते म्हणाले.
कोणत्याही अटी शर्थींशिवाय जे पक्षाप्रती निष्ठा सिद्ध करतील, अशाच भाजप आणि जेडीएसच्या नेत्यांना पक्षनेतृत्व स्वीकारेल, असं सिद्धरामय्या म्हणाले. एएनआयनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. "भाजप आणि जेडीएसचे काही नेते माझ्या संपर्कात आहेत. परंतु मी त्यांच्या नावांचा खुलासा करणार नाही. काँग्रेसमध्ये सामील होण्यासाठी त्यांना आमच्या पक्षावर विश्वास असायला हवा. त्यांना पक्ष नेतृत्वाला स्वीकारुनच आमच्यासोबत यावं लागेल, याशिवाय त्यांच्या कोणत्याही अटी शर्थी असू नयेत," असं ते म्हणाले.
जुलै २०१९ मध्ये राजकीय संकटजुलै २०१९ मध्ये कर्नाटकात राजकीय भूकंप आला होता. काँग्रेस आणि जेडीएसच्या सरकारच्या तब्बल २५ आमदारांनी पक्ष सोडण्याची घोषणा केली होती. त्यानंतर काँग्रेस आणि जेडीएसचं सरकार पडलं. यानंतर भाजपला बहुमत सिद्ध करण्यात यश आलं. त्यानंतर भाजपनं सरकार स्थापन केलं आणि बीएस येडियुरप्पा हे मुख्यमंत्री झाले. परंतु नंतर येडियुरप्पा यांनी राजीनामा दिला आणि मुख्यमंत्रिपदाची धुरा बसवराज बोम्मई यांच्या हाती सोपवण्यात आली.