कर्नाटकातील सर्वच्या सर्व 224 जागांसाठी आज (बुधवारी) मतदान पार पडले. यानंतर एक्झिट पोलचे आकडेही समोर आले आहेत. बहुतांश जागांवर काँग्रेस आणि भाजप यांच्यात काट्याची टक्कर दिसत आहे. कर्नाटकमध्ये या निवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष बनताना दिसत आहे, मात्र तो बहुमताच्या आकड्यापासून दूर आहे. तर, दोन एक्झिट पोलमध्ये कर्नाटकात भाजप सरकार स्थापन करण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. "न्यूज नेशन-सीजीएस आणि एशियानेट न्यूज-जन की बात" या दोहोंच्या सर्वेक्षणात कर्नाटकात काँग्रेस दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष, तर भाजप सरकार स्थापन करण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
न्यूज नेशन-सीजीएस एक्झिट पोलनुसार, भाजपला 114 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसला 86 जागा मिळण्याची शक्यता आहे. या सर्वेक्षणात जेडीएसला 21 आणि इतरांना तीन जागा मिळण्याची शक्यता आहे. कर्नाटकात बहुमताचा आकडा 113 असून भाजपला 114 जागा मिळणे अपेक्षित आहे. असे झाल्यास भाजपला कर्नाटकात आपले सरकार कायम ठेव्यात यश येईल.
न्यूज नेशन-सीजीएस एक्झिट पोल -बीजेपी - 114काँग्रेस - 86 जेडीएस - 21 इतर - 3
याच बरोबर, एशियानेट न्यूज-जन की बातच्या एक्झिट पोलमध्ये भाजपला बहुमत मिळण्याची शक्यता आहे. भाजपला येथे 94-117 जागा मिळू शकतात. तसेच, काँग्रेसला 91-106 जागा मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय, जेडीएसला 14-24 जागा मिळू शकतात. तर इतरांना शून्य ते दोन जागा मिळणे अपेक्षा आहे.
एशियानेट न्यूज-जन की बातचा एक्झिट पोल -बीजेपी - 94-117 काँग्रेस - 91-106 जेडीएस - 14-24 इतर - 0-2
इतर एक्झिट पोलमध्ये काँग्रेस आघाडीवर - बहुतांश एक्झिट पोलमध्ये कर्नाटकात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येत असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 'झी न्यूज' आणि 'मॅट्रिक्स'च्या एक्झिट पोलनुसार, 41 टक्के मतांसह काँग्रेसला 103 ते 118 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर भारतीय जनता पक्षाला 36 टक्के मतांसह 79 ते 94 जागा मिळण्याची शक्यता वरतवली गेली आहे. यासिवाय, जनता दल (सेक्युलर)ला 25 ते 33 जागा मिळण्याची शक्यता आहे.
तसेच, 'TV9' आणि 'पोलस्ट्रॅट'ने केलेल्या सर्वेक्षणात काँग्रेसला 99 ते 109 जागा मिळू शकतात, तर भाजपला 88 ते 98 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तसेच, JD(S) ला 21 ते 26 जागा मिळू शकतात. याशिवाय, 'एबीपी न्यूज' आणि 'सी-व्होटर'च्या एक्झिट पोलने काँग्रेसला 100 ते 112 जागा, भाजपला 83 ते 95 आणि जेडीएसला 21 ते 29 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे.