नवी दिल्ली - एखाद्या व्यक्तीविरोधात अनेकदा पोलीस ठाण्यात तक्रार केली जाते. पण तुम्हाला जर कोणी एखाद्या प्राण्याविषयी तक्रार केल्याचं सांगितलं तर सुरुवातीला खोटं वाटेल पण हो हे खरं आहे. एका शेतकऱ्याने आपल्याच गायीची तक्रार केली आहे. गाय दूध देत नाही म्हणून तो तिलाच घेऊन थेट पोलीस ठाण्यात पोहाचला. आपली गाय दूध देत नाही आता तुम्हीच तिला थोडं समजवा अशी विनवणी शेतकऱ्याने चक्क पोलिसांना केली. शेतकऱ्याची अशी तक्रार ऐकून पोलीस अधिकारीही हैराण झाले.
कर्नाटकच्या शिमोगा जिल्ह्यात ही अजब घटना घडली आहे. सिदलीपूर गावातील शेतकरी रमैया याने होलेहोन्नूर पोलीस ठाण्यात ही अनोखी तक्रार दिली आहे. चारा खायला घातल्यानंतरही आपली गाय दूध देत नाही आहे, असं त्याने पोलिसांना सांगितलं. खरंतर पाळीव प्राण्यांसंबंधी कोणतीही समस्या असेल तर त्यांना प्राण्यांच्या डॉक्टरांकडे नेलं जातं. पण या शेतकऱ्याने गाय दूध देत नाही म्हणून तिला घेऊन थेट पोलीस स्टेशनच गाठलं आहे. शेतकऱ्याच्या या कृतीने ग्रामस्थांनी ही धक्का बसला आहे.
गायीची तक्रार घेऊन थेट पोलीस ठाण्यात पोहोचला शेतकरी
मीडिया रिपोर्टनुसार, शेतकऱ्याने दावा केला आहे की तो दररोज सकाळी 8 आणि रात्री 11 वाजता आपल्या गायीला चारा खायला घेऊन जातो. संध्याकाळी 4 आणि 6 वाजताही तो तिला चारा देतो. पण तरी गेल्या 4 दिवसांत तिने दूध दिलेलं नाही. गायीला दूध देण्यासाठी आता तुम्हीच तयार करा असं शेतकऱ्याने म्हटलं आहे. शेतकऱ्याची ही समस्या ऐकून पोलीसही हैराण झाले. त्यांनी त्या शेतकऱ्याला समजावलं. आपण या समस्येचं निवारण करू शकत नाही, अशी तक्रार नोंदवली जात नाही असं सांगून त्यांनी त्या शेतकऱ्याला घरी परत पाठवलं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
'साहेब, म्हैस दूध देत नाही, मदत करा...!'
काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशमध्ये देखील अशीच एक घटना घडली होती. मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने म्हैस दूध देत नाही, म्हणून तिला घेऊन थेट पोलीस ठाणेच गाठले आणि काही दिवसांपासून माझी म्हैस दूध देत नी मला मदत करा, तक्रार केली होती. यानंतर, पोलिसांनी पशुवैद्यकीय डॉक्टरशी संपर्क साधून त्या शेतकऱ्याला म्हशीचे दूध काढण्यास मदत केली होती. बाबुलाल जाटव नावाच्या एका व्यक्तीने नायगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यात, गेल्या काही दिवसांपासून त्यांची म्हैस दूध देत नाही, असे सांगण्यात आले होते. यानंतर, सुमारे चार तासांनंतर तो थेट आपल्या म्हशीला घेऊनच पोलीस ठाण्यात आला आणि त्याने म्हशीचे दूध काढण्यासाठी पोलिसांची मदत मागितली होती.