बंगळुरु : कर्नाटकमधील सत्तेच्या नाटकाचा शेवटचा अंक आज संध्याकाळी पाहायला मिळणार आहे. राज्यपालांनी भाजपाला बहुमत सिद्ध करण्यासाठी 15 दिवसांची मुदत दिली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयानं ही मुदत कमी करत आज संध्याकाळी 4 वाजता बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले. त्यामुळे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांची खुर्ची राहणार की जाणार, हे आज संध्याकाळी ठरेल. कर्नाटक विधानसभेत 224 आमदार निवडून जातात. मात्र दोन जागांवर निवडणूक झालेली नाही. त्यात जेडीएस नेते कुमारस्वामी 2 जागांवरुन निवडून आले आहेत. त्यामुळे कर्नाटक विधानसभेत सध्या 221 आमदार आहेत. त्यामुळे भाजपाला बहुमत सिद्ध करण्यासाठी 111 आमदारांचा पाठिंबा आवश्यक आहे. भाजपाचे 104 आमदार आहेत. तर निवडणुकीनंतर एकत्र आलेल्या काँग्रेस आणि जेडीएसच्या आमदारांच्या संख्येची बेरीज केल्यास ती 118 इतकी होते. कर्नाटक विधानसभेतील सध्याचं पक्षीय बलाबल लक्षात घेता पुढील 5 शक्यता महत्त्वाच्या ठरतात.1. बहुमत चाचणीवेळी काँग्रेस आणि जेडीएसचे कमीतकमी सात आमदार येडियुरप्पा सरकारच्या बाजूनं मतदान करु शकतात. मात्र मग ते आमदार पक्षांतर कायद्यांतर्गत दोषी ठरतील. 2. काँग्रेस-जेडीएसचे 14 आमदार शपथविधीनंतर लगेच राजीनामा देऊ शकतात. यामुळे विधानसभेतील आमदारांची संख्या 206 वर येईल. त्यामुळे बहुमताचा आकडा 104 वर येईल आणि सरकार वाचवण्यात येडियुरप्पा यशस्वी ठरतील. या परिस्थितीत आमदारांचं सदस्यत्व रद्द होईल. मग या आमदारांना भाजपाकडून पोटनिवडणुकीचं तिकीट दिलं जाऊ शकतं. 3. बहुमत सिद्ध करण्याची प्रक्रिया सुरु होताच विधानसभेत गोंधळ होऊ शकतो. विधानसभेच्या कामकाजात अडथळे आणले जाऊ शकतात. यावेळी हंगामी अध्यक्षांची भूमिका महत्त्वाची ठरु शकते. हंगामी अध्यक्ष बोपय्या काही आमदारांचं निलंबन करु शकतात. तसं झाल्यास बहुमताचा आकडा खाली येईल. 4. काँग्रेस-जेडीएस त्यांच्या आमदारांची फोडाफोड रोखण्यात यशस्वी होऊ शकतात. शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेस, जेडीएस यामध्ये यशस्वी ठरल्यास येडियुरप्पांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागेल. 5. आपल्याकडे बहुमत नाही, हे लक्षात घेऊन बहुमत चाचणीला सामोरं जाण्याआधीच येडियुरप्पा राजीनामा देऊ शकतात.बहुमता चाचणीवेळी होणारी नाचक्की टाळण्यासाठी हे पाऊल उचललं जाऊ शकतं. यामुळे 2019 च्या लोकसभा निवडणुकीवेळी सहानुभूतीची मतंदेखील मिळवू शकतात. सर्वात मोठा पक्ष असतानाही आम्ही सत्ता सोडली, असा प्रचार त्यावेळी भाजपाकडून केला जाऊ शकतो. याआधी येडियुरप्पा यांनी अशी खेळी केली आहे. 2007 मध्ये त्यांनी असं केलं होतं. त्यावेळी येडियुरप्पा केवळ सात दिवस मुख्यमंत्री होते.
Karnataka Floor Test: ...तर येडियुरप्पा वेगळीच खेळी खेळतील; स्वतःच म्हणतील, 'आमच्याकडे बहुमत नाही!'
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2018 12:51 PM