बंगळुरु: काँग्रेस-जेडीएस आघाडीनं कर्नाटक विधानसभेत बहुमत सिद्ध केलंय. काँग्रेस-जेडीएस युतीला 117 मतं मिळाली आहेत. त्यामुळे कर्नाटकमध्ये काँग्रेस-जेडीएसचं सरकार कायम राहणार आहे. हे सरकार 5 वर्षे कायम राहील, असा विश्वास कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी व्यक्त केला. काँग्रेस-जेडीएसनं बहुमत सिद्ध करण्याआधी भाजपच्या आमदारांनी सभात्याग केला.
कर्नाटक विधानसभेत मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी बहुमत सिद्ध केलं. बहुमत चाचणीत कुमारस्वामी यांनी 117 मतं मिळाली. यामुळे कर्नाटकमधील राजकीय नाट्यावर आज पडदा पडला. काँग्रेस-जेडीएसनं बहुमत सिद्ध केल्यानं कुमारस्वामी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी कायम राहतील. बहुमत चाचणीच्या आधी विधानसभेत मोठा गोंधळ झाला. यानंतर भाजपाचे आमदार सभागृहाबाहेर पडले.
बहुमत चाचणीआधी भाजपाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्यावर जोरदार टीका केली. शेतकऱ्यांचं कर्ज माफ न केल्यास भाजपा 27 मेपासून राज्यव्यापी बंद पुकारेल, असा इशारा त्यांनी दिला. सत्तेसाठी तुम्ही काहीही करु शकता, अशा शब्दांमध्ये येडियुरप्पा कुमारस्वामींवर बरसले. काँग्रेस आणि जेडीएसच्या आमदारांची फाटाफूट टाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे काँग्रेस आमदार शिवकुमार यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला. तुम्ही कोणासाठी नायक, तर कोणासाठी खलनायक असू शकता. तुम्ही सर्वांसाठी नायक असू शकत नाही, असा टोला येडियुरप्पा यांनी लगावला.