कर्नाटक वाणिज्य आणि उद्योग विभागाने 2 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या तीन दिवसीय ग्लोबल इन्व्हेस्टर्स मीटसाठी पाच मिनिटांचा प्रमोशनल व्हिडिओ तयार करण्यासाठी एका चित्रपट निर्मिती कंपनीसोबत 4.5 कोटी रुपयांचा करार केला आहे. यावरून आता एकच गोंधळ निर्माण झाला. यानंतर उद्योगमंत्र्यांनी करार रद्द करण्याचे निर्देश दिले आहे.
राज्याचे उद्योगमंत्री मुरुगेश निरानी यांनी आता विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना पत्र लिहून करार रद्द करण्याचे निर्देश दिले आहेत. विभागाने एका चित्रपट निर्मिती कंपनीसोबत 4.5 कोटी रुपये खर्च करून पाच मिनिटांचा प्रमोशनल व्हिडिओ तयार करण्यासाठी करार केला असल्याचे निदर्शनास आले आहे, असे मुरुगेश निरानी म्हणाले.
मुरुगेश निरानी यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, पाच मिनिटांच्या व्हिडिओसाठी 4.5 कोटी रुपये खर्च करणे, हे जरा जास्त वाटत आहे. करारावर स्वाक्षरी केल्यानंतर विभागाने कार्यादेश दिले, हे खरे असेल, तर एवढ्या मोठ्या खर्चात असा करार सुरू ठेवणे अन्यायकारक आणि अनावश्यक आहे. अशी कार्यादेश रद्द करण्याचे निर्देश दिले जात आहेत.
दरम्यान, बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्वाखालील कर्नाटक सरकार इन्व्हेस्ट कर्नाटक ग्लोबल इन्व्हेस्टर्स मीट यशस्वी करण्यासाठी सर्व तयारी करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 नोव्हेंबरला या कार्यक्रमाचे उद्घाटन करणार आहेत. या कार्यक्रमात अर्थमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, भगवंत खुबा आणि नितीन गडकरी सामील होणार आहेत.
ग्लोबल इन्व्हेस्टर्स मीट हे नवीन वाढीच्या संभाव्यतेचा शोध घेण्यासाठी जगभरातील इंडस्ट्री लीडर्स, इनोव्हेटर्स आणि पॉलिसी मेकर्सशी कनेक्ट होण्यासाठी एक व्यासपीठ असणार आहे. यंदाच्या ग्लोबल इन्व्हेस्टर्स मीटमध्ये विकासाचा अजेंडा तयार करण्यासाठी विचारवंत, राजकीय नेते आणि व्यापारी नेत्यांवर भर असणार आहे.