बंगळुरू - कर्नाटकात दरवर्षी 10 नोव्हेंबर रोजी टिपू सुलतानची जयंती साजरी केली जाते. मात्र, यावर्षी भाजपा आणि काही हिंदुत्ववादी गटांनी टिपू सुलतानची जयंती साजरी करण्यावर आक्षेप घेतला आहे. तसेच सरकारी कार्यक्रम उधळून लावण्याची धमकी दिली आहे. भाजपाच्या विरोधानंतरही शनिवारी (10 नोव्हेंबर) कर्नाटकमध्ये टिपू सुलतानची जयंती साजरी केली जात आहे. तर दुसरीकडे जयंतीला विरोध करण्यासाठी अनेक जण रस्त्यावर उतरले आहेत. पोलिसांनी अनेक भाजपा नेत्यांना ताब्यात घेतले आहे.
कर्नाटकमध्ये 2016 पासून टिपू सुलतानची जयंती साजरी करण्यात येत आहे. मात्र, यंदा यावरुन चांगलेच राजकारण तापले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील अतिसंवेदनशील दोन शहरांमध्ये कर्नाटक पोलिसांकडून जमाव बंदीचे 144 कलम लागू केले आहे. दरम्यान, कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी प्रकृती अस्वास्थ्यामुळे या सरकारी कार्यक्रमाला हजर राहणार नाहीत.
कर्नाटक सरकारने याआधी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी कितीही आंदोलने केली तरी कोणाच्याही हस्तक्षेपाशिवाय हा जयंतीचा कार्यक्रम पार पडणार असल्याचेही म्हटले होते. तसेच सध्या खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारने हुबळी आणि धारवाड या शहरांमध्ये जमावबंदी लागू केली आहे.