बंगळुरू : कर्नाटकात काँग्रेसच्या पाठिंब्याने गेल्या वर्षी २३ मे रोजी कुमारस्वामी सरकार स्थापन झाले, तेव्हा भाजपविरोधातील सर्व पक्षांचे नेते बंगळुरूला आले होते आणि त्यांनी शक्तिप्रदर्शन केले होते. त्यामुळे भाजपविरोधात सारे विरोधक एकत्र येत असल्याचे चित्र निर्माण झाले होते; पण लोकसभा निवडणुकांत ते एकत्र आले नाहीत आणि प्रत्यक्ष निवडणुकांत त्यांचा दणकून पराभवही झाला. त्यामुळेच भाजपने कुमारस्वामी सरकार पाडण्याची जोरदार तयारी सुरू केली आणि त्यात यशही मिळवले.
खरे तर कुमारस्वामी सरकार स्थापन झाल्यापासून ते पाडण्याचे प्रयत्न भाजप आणि विशेषत: येडियुरप्पा सतत प्रयत्न करीत होते. येडियुरप्पा यांना मुख्यमंत्री होण्याची झालेली घाई लपून राहिली नव्हती. पण लोकसभा निवडणुकांच्या काळात भाजप श्रेष्ठींनी त्यांना शांत राहायला सांगितले होते. निवडणुकांचे निकाल लागल्यावर मात्र भाजपने दक्षिणेकडील राज्य हाती मिळवण्यासाठी सारी ताकद लावली.अर्थात सरकार स्थापन झाल्यानंतर काही महिन्यांमध्ये काँग्रेस व जनता दलाचे काही आमदारांनी नाराजी व्यक्त करायला सुरुवात केली होती. काही मंत्रिपद न मिळाल्याने, काही जण आपली कामे होत नसल्याने तर काही आमदार भाजपच्या येणाऱ्या आॅफर्समुळे बंडखोरीच्या तयारीत होते. लोकसभा निवडणुकांत कर्नाटकात पराभव झाल्यानंतर या आमदारांनी नेतृत्वालाच आव्हान द्यायला सुरुवात केली. कुमारस्वामी, त्यांचे वडील व माजी पंतप्रधान देवेगौडा यांच्या घराणेशाहीमुळेही अनेक जण चिडले होते. सत्ताधारी आमदारांना ५ कोटी ते १५ कोटी रुपयांपर्यंतची आॅफर्स देण्यात आल्याची ध्वनिफितही काँग्रेस नेत्यांनी उघड केली होती. मंत्रिपद हवे असल्यास ५ कोटी आणि त्यात रस नसल्यास १५ कोटी असा दर भाजपने नक्की केल्याचा आरोप काँग्रेस नेते करीत होते. विधानसभा पोटनिवडणुकांत उमेदवारी आणि निवडून आणण्याचा खर्च अशीही आॅफर भाजपने दिल्याचा काँग्रेसचा आरोप होता.
येडियुरप्पा यांची आतापर्यंतची कारकीर्द पाहता, त्यात तथ्य असू शकते, असे अनेकांना वाटते. आधी भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे मुख्यमंत्रीपद सोडावे लागले होते. त्यांनी बेल्लारीतील रेड्डी बंधूंना अवैध खाणकामात दिलेल्या साथीमुळे त्यांच्यावर भाजपचे नेतेही तेव्हा नाराज होते.
अर्थात येडियुरप्पा यांच्यासारखा साम-दाम-दंड-भेद यात निष्णात असा एकही नेता कर्नाटक भाजपकडे नसल्याने भाजपने त्यांना दूर केले नाही. किंबहुना त्यांनी तेव्हा भाजप सोडून नव्या पक्षाची स्थापना केली. तरीही बंडखोरी करणाºया या नेत्याला नंतर भाजपनेच सन्मानाने पक्षात आणले होते.