बंगळुरु - कर्नाटकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन सिद्धरमय्या सरकारला धारेवर धरत शेलक्या शब्दांत टीका केली आहे. दावणगेरे येथे एका प्रचारसभेत बोलताना नरेंद्र मोदींनी म्हटलं की, 'काही लोकांना विश्वास आहे की कर्नाटकात सिद्धरमय्या यांचं सरकार आहे. पण सत्य हे आहे की इथे 'सीधा रुपैया'चं सरकार आहे. प्रत्येक गोष्टीत तेव्हाच काम होतं जेव्हा तिथे पैसा असतो. हा 'सीधा रुपैया' गेला पाहिजे'. भ्रष्टाचार आणि घराणेशाहीवरुन काँग्रेसवर टीका करताना नरेंद्र मोदींनी म्हटलं की, 'एका कुटुंबाने 48 वर्ष देशावर राज्य केलं, आणि एक चहा विकणारा गेल्या 48 महिन्यांपासून देशाचा कारभार चालवत आहे. श्रीमंत कुटुंबामध्ये जन्माला आल्याने या 48 वर्षात त्यांनी शेतक-यांची साधी दखल घेतली नाही. पण आम्ही फक्त 48 महिन्यात शेतक-यांना मिळणारी किमान आधार किंमत दीडपटीने वाढवली आहे'.
कर्नाटकमध्ये एप्रिल किंवा मे महिन्यात विधानसभा निवडणूक पार पडण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत राज्यातील सत्ताधारी पक्ष काँग्रेस आणि विरोधी पक्ष भाजपा यांच्यासहित इतर पक्षांनी जोमात प्रचाराला सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 27 फेब्रुवारीला दावणगेरे येथे एका प्रचारसभेला संबोधित केलं. ते बोलले की, 'कर्नाटक सरकराचा पराभव निश्चित आहे. आपल्या चुकीच्या गोष्टींमुळे सरकारची लोकप्रियता कमी झाली आहे. प्रत्येक निवडणुकीत जनता काय करत आहे ? ते काँग्रेसला हटवत आहे. काँग्रेससोबत त्यांची नुकसान पोहचवणारी संस्कृतीही जाईल'.
निवडणूक आयोगाने अद्याप कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या तारखा घोषित केलेल्या नाहीत. एप्रिल किंवा मे मध्ये निवडणूक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशा परिस्थितीत राज्यात सत्तेत असणा-या काँग्रेस आणि मुख्य विरोधी पक्ष भाजपाने प्रचार करण्यात कोणतीही कसर सोडलेली नाही. दोन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते प्रचाराचा मोर्चा सांभाळत आहेत. राहुल गांधी मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांच्यासोबत मिळून अनेक प्रचारसभा घेत आहेत. तर दुसरीकडे, भाजपाकडून राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्रीपदाचे दावेदार येदियुरप्पा सलग प्रचारसभा घेत आहे.
पंजाबनंतर कर्नाटक एकमेव मोठं राज्य आहे जिथे काँग्रेस सत्तेत आहे. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा सत्तेत येण्यासाठी भाजपा पुरेपूर प्रयत्न करत आहे. काही आठवड्यांपुर्वी आलेल्या सर्व्हेत काँग्रेसचं पारडं जड असल्याचं सांगण्यात आलं होतं. काँग्रेस बहुमताने सत्तेत येईल असा अंदाज सर्व्हेतून मांडण्यात आला आहे.