कर्नाटक सरकारने बुधवारी एक मोठा निर्णय घेताना स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पंजाब नॅशनल बँकेसोबतच्या सर्व व्यवहारांना तत्काळ प्रभावाने स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भातील आदेश प्रसिद्ध करण्यात आले आहेत. या आदेशांनुसार राज्यातील विभागांना या दोन्ही बँकांमधील खाती बंद करण्याचे आणि आपल्या ठेवी काढण्याचे आदेशही दिले आहेत.
सरकारकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या आदेशांनुसार या दोन्ही बँकांमध्ये कुठल्याही ठेवी ठेवण्यात येऊ नयेत अशी सूचना देण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री सिद्धारमैय्या सरकारमदील वित्तविभागाचे सचिव जाफर यांच्याकडून हा आदेश दोन्ही बँकांमध्ये जमा असलेल्या सरकारी पैशांच्या निधीचा दुरुपयोग होत असल्याचं वृत्त आल्यापासून केला जात आहे. याबाबत सरकारने सांगितलं की, पैशांच्या कथित गैरवापराबाबत वारंवार ताकिद दिल्यानंतरही एसबीआय आणि पीएनबी यांनी त्यांच्याकडून कुठलंही पाऊल उचललं नाही. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
एसबीआय आणि पीएनबीबाबत कर्नाटक सरकारने दिलेल्या आदेशांनुसार राज्य सरकारच्या सर्व विभागांनी सार्वजनिक उद्योग, सर्व महानगरपालिका आणि नगरपालिका, विद्यापीठांसह इतर संस्थांना त्यांची एसबीआय आणि पीएनबीमध्ये असलेली खाती बंद करून त्यातील जमा असलेल्या ठेवी परत घेण्यास सांगण्यात आलं आहे. तसेच कर्नाटकमध्ये सरकारी विभागांची बहुतांश खाती ही याच दोन बँकांमधून चालवली जातात. मात्र आता सरकारने एसबीआय आणि पीएनबीमध्ये जमा असलेल्या रकमेच्या दुरुपयोचा गंभीर आरोप करून या बँकांमधील खाती ही तत्काळ प्रभावाने बंद करण्याची सूचना दिली आहे.