Karnataka Hanuman Bhajan: सध्या रमजानचा पवित्र महिना सुरू आहे. अशातच बंगळुरुमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अजानच्या वेळी हनुमान चालीसा लावल्यामुळे एका दुकानदाराला टोळक्याने बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. टोळक्याने जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप दुकानदार तरुणाने केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बंगळुरुच्या नागरथपेठ परिसरात घडली. एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना पीडित तरुण म्हणाला, 'मी संध्याकाळी 6 वाजता दुकानातील स्पीकरवर हनुमान चालीसा लावली होती. यावेळी काही जणांनी मला हनुमान चालीसा बंद करण्यास सांगितले. मी त्यांना नकार दिल्यावर त्यांनी वाद घातला आणि मला मारहाण सुरू केली.' हल्ला करणाऱ्या टोळक्यापैकी 2 ते 3 जणांना तो ओळखतो.
पोलीस काय म्हणाले?या प्रकरणाबाबत पोलिसांनी सांगितले की, हलसूरू गेट पोलिस हद्दी पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत. लवकरच आरोपींना ताब्यात घेतले जाईल.
भाजपची काँग्रेसवर टीकाया घटनेनंतर भाजप खासदार तेजस्वी सुर्या यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. 'अशा घटकांना प्रोत्साहन देणे, हा काँग्रेसच्या तुष्टीकरणाच्या राजकारणाचा परिणाम आहे. काही दिवसांपूर्वीच पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या लोकांना जामीन देण्यात आला होता. जिहादींना असे राजकीय पाठबळ मिळाल्याने साहजिकच आपल्या राज्यात हिंदूंविरुद्धच्या अशा गुन्ह्यांच्या घटना वाढल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी चुकीचे उदाहरण मांडणे बंद करावे,' अशी टीका त्यांनी केली.