बंगळुरू : बलात्कार आणि लैंगिक छळाचा आरोप असलेले माजी खासदार प्रज्वल रेवन्ना यांच्या जामीन आणि अटकपूर्व जामीन अर्जावर बंद खोलीत सुनावणी करण्याचा निर्णय कर्नाटकउच्च न्यायालयानं सोमवारी दिला. या प्रकरणाची सुनावणी बंद खोलीत केली जाईल. या प्रकरणाची खुल्या न्यायालयात सुनावणी होऊ शकत नाही. कोणत्याही किंमतीत कोणत्याही व्यक्तीचा अपमान केला जाऊ नये, असं न्यायमूर्ती एम. नागप्रसन्न यांच्या खंडपीठानं सांगितलं.
विशेष सरकारी वकील रविवर्मा कुमार यांच्या विनंतीनंतर बंद खोलीत सुनावणी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पीडितांची ओळख उघड होऊ नये आणि त्यांची ओळख सुरक्षित राहावी, यासाठी या प्रकरणाची सुनावणी बंद खोलीत घेण्यात यावी, अशी विनंती विशेष सरकारी वकील रविवर्मा कुमार यांनी यापूर्वी कर्नाटकउच्च न्यायालयात केली होती.
विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखलसुनावणीदरम्यान, एकल खंडपीठाला सांगण्यात आले की, प्रज्वल रेवन्ना यांच्या विरोधात विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले असून त्याची प्रत उच्च न्यायालयात सादर करण्यात आली आहे. प्रज्वल रेवन्ना सध्या येथील परप्पाना अग्रहारा तुरुंगात न्यायालयीन कोठडीत आहेत. विशेष तपास पथक (एसआयटी) प्रज्वल रेवन्ना यांच्याविरुद्ध चार वेगवेगळ्या प्रकरणांचा तपास करत आहे.
एसआयटीने केली होती अटक होलेनारसीपुरा पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या गुन्ह्याच्या संदर्भात प्रज्वल रेवन्ना हे जर्मनीहून बंगळुरू विमानतळावर पोहोचल्यावर एसआयटीने ३१ मे रोजी अटक केली होती. प्रज्वल रेवन्ना यांची जामीन याचिका या प्रकरणाशी संबंधित आहे, तर अटकपूर्व जामीन याचिका येथे एसआयटीने नोंदवलेल्या अन्य एका गुन्ह्याशी संबंधित आहे.
प्रज्वल रेवन्ना यांना पक्षानं केलंय निलंबित२६ एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीपूर्वी हसनमध्ये कथितपणे प्रज्वल रेवन्ना यांचा समावेश असलेले अश्लील व्हिडिओ असलेले पेन-ड्राइव्ह वितरित करण्यात आले होते. तेव्हा लैंगिक शोषणाची प्रकरणे उघडकीस आली. यानंतर प्रज्वल रेवन्ना यांच्यावर अनेक महिलांनी लैंगिक छळ केल्याचे आरोप केले असून, गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या संदर्भात विविध गुन्हे दाखल झाल्यानंतर जेडीएसने हसनचे माजी खासदार प्रज्वल रेवन्ना यांना पक्षातून निलंबित केले होते.