बंगळुरू- कर्नाटकात राजकीय हालचालींना वेग आला आहे. अपक्ष आमदार आर. शंकर आणि एच. नागेश यांनी काँग्रेस-जेडीएस सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे. आज मकरसंक्रांत आहे. त्यामुळे याच दिवशी सरकार बदलावं, असं मला वाटतं. सरकार हे कार्यक्षम असलं पाहिजे, असे अपक्ष आमदार आर. शंकर म्हणाले आहेत. तर एच. नागेश यांनीही पाठिंबा काढल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेस-जेडीएसच्या आघाडीचे पक्ष स्थिर सरकार देतील, अशी आशा होती. त्या दोन्ही पक्षांमध्ये कोणतंही सामंजस्य नाही. त्यामुळेच काँग्रेस-जेडीएसचा पाठिंबा काढून मी भाजपाला पाठिंबा देणार आहे, असं म्हणत एच. नागेश यांनीही काँग्रेस-जेडीएस सरकारवर हल्लाबोल केला आहे.तत्पूर्वी कर्नाटकमधील काँग्रेस-जेडीएसची सत्ता उलथून टाकण्यासाठी भाजपानं जोरदार प्रयत्न करत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. काँग्रेस-जेडीएसचं सरकार पाडण्यासाठी भाजपानं काँग्रेसचे काही आमदार गळाला लावले असून, 17 जानेवारीपर्यंत भाजपा सरकार पाडण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. भाजपाकडून आमदार फोडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप काँग्रेस नेते डी. के. शिवकुमार यांनी केला होता. तर काँग्रेसला स्वत:चे आमदार सांभाळता येत नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडून आमच्यावर आरोप केले जात असल्याचा पलटवार भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री सदानंद गौडा यांनी केला होता.कर्नाटकच्या विधानसभेत काँग्रेस आणि जेडीएसचे एकूण 116 आमदार आहेत. तर भाजपाच्या आमदारांची संख्या 104 इतकी आहे. काँग्रेस-जेडीएसला दोन अपक्षांनी पाठिंबा दिला होता, परंतु त्यांना आता तो पाठिंबा काढून घेतला आहे. यासोबतच बहुजन समाज पार्टीचा एक आमदारदेखील त्यांच्या सोबत आहे. त्यामुळे काँग्रेस-जेडीएसचं संख्याबळ 119 वर जातं. अपक्ष आमदार आर. शंकर आणि बहुजन समाज पार्टीच्या एन. महेश यांची कॅबिनेटमधून गच्छंती करण्यात आल्यानं त्यांचे सत्ताधाऱ्यांसोबतचे संबंध ताणले गेले आहेत.विधानसभेतील आमदारांची संख्या 207 वर आणण्याचा भाजपाचा प्रयत्न असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. अशा परिस्थितीत बहुमताचा आकडा 104 होईल. भाजपाकडे सध्या इतकेच आमदार आहेत. मात्र यासाठी भाजपाला सत्तेत असलेल्या 16 आमदारांचे राजीनामे आवश्यक आहेत.दोन अपक्ष आणि एक बसपा आमदार यांची नाराजी भाजपाच्या पथ्यावर पडू शकते. मात्र इतक्या आमदारांच्या राजीनाम्यांबद्दल राजकीय विश्लेषक महादेव प्रकाश यांनी शंका व्यक्त केली. निवडणूक होऊन फक्त 7 महिने झाले आहेत. त्यामुळे इतके आमदार राजीनामे देतील, असं वाटत नसल्याचं प्रकाश म्हणाले.