बंगळुरू : कर्नाटकचे भाजप आमदार मदल विरुपक्षप्पा यांना भ्रष्टाचार प्रकरणी उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मिळाला आहे. यानंतर मदल विरुपक्षप्पा यांचे त्यांच्या गावी दावणगेरे येथे जल्लोषात स्वागत करण्यात आले. दरम्यान, मदल विरुपक्षप्पा यांच्या मुलाला 40 लाख रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. मुलासह अन्य चौघांनाही अटक करण्यात आली.
मुलाच्या अटकेनंतर आमदार मदल विरुपक्षप्पा हे गेले 5 दिवस गायब झाले होते. मात्र, आता या प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर मदल विरुपक्षप्पा समोर आले आहेत. यावेळी त्यांच्यासोबत कार्यकर्त्यांची मोठी गर्दी दिसून आली. तसेच, यावेळी कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आमदार मदल विरुपक्षप्पा यांनी गाडीतून लोकांच्या दिशेने हात फिरवला. तसेच, यावेळी फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली.
कर्नाटक सोप्स अँड डिटर्जंट्स लिमिटेड (KSDL) कंत्राट घोटाळ्यात मदल विरुपक्षप्पा यांना मुख्य आरोपी बनवण्यात आले होते. याप्रकरणी त्यांचा मुलगा प्रशांत मदल याला लाच घेताना पकडले होते. KSDL कार्यालयात 40 लाखांची लाच घेतल्याच्या आरोपावरून लोकायुक्त पोलिसांनी 2 मार्च रोजी प्रशांतला अटक केली. प्रशांत हे बंगळुरू पाणीपुरवठा आणि मलनिस्सारण मंडळात मुख्य लेखा अधिकारी आहेत. आपल्या मुलाच्या अटकेनंतर चन्नागिरीचे भाजप आमदार मदल विरुपक्षप्पा यांनी केएसडीएलच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.
दरम्यान, सशर्त जामीन मंजूर करताना न्यायालयाने आमदार मदल विरुपक्षप्पा यांना आदेशाची प्रत मिळाल्यानंतर 48 तासांच्या आत या प्रकरणातील तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, जामिनावर बाहेर असताना साक्षीदारांवर प्रभाव टाकू नये, असे निर्देशही न्यायालयाने मदल विरुपक्षप्पा यांना दिले आहेत. या अर्जाची सुनावणी 17 मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.