Karnataka Crime:कर्नाटकातील कोडागु जिल्ह्यात पाच वर्षांपूर्वी घडलेल्या कथित हत्येच्या प्रकरणात आता खळबळजनक खुलासा झाला आहे. पोलिसच्या म्हणण्यांनुसार, पाच वर्षांपूर्वी एका व्यक्तीने आपल्या पत्नीची हत्या केली होती. ज्यासाठी तो गेल्या दीड वर्षांपासून तुरुंगात होता. तुरुंगातील व्यक्तीची पत्नी तिच्या प्रियकरासोबत हॉटेलमध्ये सापडल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाला वेगळे वळण लागले. हत्या झालेल्या महिलेला न्यायालयात हजर केल्यानंतर म्हैसूरच्या न्यायालयाने गुरुवारी पोलिस अधिकाऱ्यांवर चुकीच्या तपासाबद्दल ताशेरे ओढले.
याप्रकरणी म्हैसूरच्या पोलीस अधिक्षकाना पुन्हा चौकशी करण्याचे आणि १७ एप्रिल रोजी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. पोलिसांनी सादर केलेले पूर्वीचे आरोपपत्र या प्रकरणाशी संबंधित नसल्याचे, जिल्हा आणि सत्र न्यायाधीश गुरुराज सोमक्कलावार यांनी सांगितले. न्यायाधीशांनी यावेळीपोलीस अधिकाऱ्यांच्या गंभीर चुकांवरही प्रकाश टाकला. चुकीच्या तपासामुळे आरोपीला त्रास सहन करावा लागला आणि तो दीड वर्ष न्यायालयीन कोठडीत होता, असेही न्यायालाने म्हटलं.
कुरुबारा सुरेशा याची खून झालेली पत्नी मल्लिगे ही जिवंत असल्याच्या खुलाशाने सगळ्यांना धक्का बसला. सुरेशाने पत्नी मल्लिगे ही डिसेंबर २०२० मध्ये कोडागु जिल्ह्यातून बेपत्ता झाल्याची तक्रार केली होती. त्यानंतर पोलिसांनी सुरेशाला अटक करुन तुरुंगात पाठवलं होतं. नऊ महिन्यांनंतर, बेट्टाडापुरा पोलिसांना एका महिलेचा मृतदेह सापडला होता. पोलिसांनी सुरेशाला तो त्याच्या पत्नीचा मृतदेह म्हणून स्वीकारण्यास भाग पाडले आणि त्याला खून खटल्यात मुख्य आरोपी बनवले.
गुन्हा स्विकारण्यास पोलिसांनी भाग पाडले
कोडगू जिल्ह्यातील बसवनहल्ली गावातील आदिवासी समाजातील सुरेशाने मल्लिगे नावाच्या महिलेशी लग्न केले होते. या जोडप्याला दोन मुले आहेत. मात्र, नोव्हेंबर २०२० मध्ये पत्नी मल्लिगे अचानक बेपत्ता झाली. त्यामुळे सुरेशाने कुशलनगर ग्रामीण पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली. पोलिसांनी अनेक दिवस या महिलेचा शोध घेतला, मात्र त्यांना पत्नी सापडली नाही. सुरेशाला मल्लिगेचे गणेश नावाच्या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती असल्याने ती त्याच्यासोबत पळून गेल्याचे तो सांगत होता. मात्र पोलिसांच्या एका पथकाने सुरेशाला बळजबरीने बेट्टाडापुरा येथे नेले आणि तेथे एका महिलेचा मृतदेह दाखवून ती मल्लिगे असल्याचे मान्य करण्यास भाग पाडले.
डीएनए चाचणीतून धक्कादायक सत्य समोर
पोलिसांनी सुरेशाला मृत महिलेची साडी आणि चप्पल दाखवून हे तुझ्या पत्नीचे आहेत का, अशी विचारणा केली. त्यानंतर पोलिसांनी तू खूना केला आहे हे मान्य कर असा दबाव टाकला. २०२१ मध्ये सुरेशाविरुद्ध बेट्टाडपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली. तुरुंगात असलेल्या सुरेशाने वकिलामार्फत न्याय मिळवण्याचे प्रयत्न सुरु केले. वकिलांच्या मागणीनंतर मृत मल्लिगेच्या आणि तिच्या आईच्या रक्ताचे नमुने डीएनए चाचणीसाठी पाठवण्यात आले. डीएनए रिपोर्टमध्ये हा मृतदेह सुरेशाच्या पत्नी मल्लिगेचा नसून दुसऱ्याच महिलेचा असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर पोलिसांनी सुरेशाला तुरुंगातून सोडून दिले.
प्रियकरासोबत सापडली पत्नी
या सगळ्या प्रकारानंतर सुरेशाने पुन्हा पोलिसात तक्रार करत पोलिसांनी पत्नीचा शोध घ्यावा, अशी मागणी केली. मात्र, तक्रारीनंतरही पोलिसांनी याप्रकरणी कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोप सुरेशाच्या वकिलांनी केला. दुसरीकडे, पत्नी मल्लिगे जिवंत असून ती मडिकेरी येथील एका हॉटेलमध्ये नाश्ता करत असल्याचे सुरेशा आणि त्याच्या मित्रांना समजले. यानंतर पोलिसांनी हॉटेल गाठून सुरेशाची पत्नी मल्लिगे हिला प्रियकरासह ताब्यात घेतले. पोलीस चौकशीत मल्लिगेने सांगितले की, ती विराजपेठेतील तिशेट्टीगेरी गावात प्रियकर गणेशसोबत राहत होती. त्यानंतर मल्लिगेला कोर्टात हजर करण्यात आलं.