बंगळुरू : कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले असून, जनता दल सेक्युलरचे सात बंडखोर आमदार काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. याशिवाय याच पक्षाचे विधान परिषदेचे तीन माजी आमदारही काँग्रेसच्या वाटेवर आहेत. जनता दल सेक्युलरच्या या सात आमदारांनी शनिवारी राजीनामा दिला असून, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत एका कार्यक्रमात ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.या सात आमदारांनी २०१६ मध्ये राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार के. सी. राममूर्ती यांना मतदान केले होते. जनता दल सेक्युलरचा व्हिप डावलून क्रॉस वोटिंग केल्याप्रकरणी हे सात आमदार कायदेशीर कारवाईला तोंड देत आहेत. या आमदारांनी शुक्रवारी पुन्हा एकदा काँग्रेसचे खासदार जी. सी. चंद्रशेखर यांना मतदान केले. त्यामुळे जनता दल सेक्युलरचे उमेदवार बी. एम. फारुक यांचा पराभव झाला.या सात आमदारांवर २३ मार्च रोजी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीपूर्वीच अपात्रतेची कारवाई करावी, अशी मागणी जनता दलाने विधानसभा अध्यक्षांकडे केली होती. मात्र, त्यांनी आपला निर्णय राखून ठेवला होता. या आमदारांचे राजीनामे स्वीकारल्यानंतर पत्रकारांशी बोलताना विधानसभा अध्यक्ष कोलिवाड म्हणाले की, या आमदारांच्या अपात्रतेबाबतचे प्रकरण माझ्याकडे प्रलंबित आहे आणि यावर निर्णय देण्यापूर्वी त्यांना राजीनामा देण्यापासून रोखणारा कोणताही कायदा नाही.या सात आमदारांनी दिले अध्यक्षांकडे राजीनामेजनता दलाचे प्रदेशाध्यक्ष एच. डी. कुमारस्वामी, माजी आमदार बी. झेड. जमीर अहमद खान (चमाराजपेट), एन. चेल्लुवार्यस्वामी (नागमंगला), भीमा नाईक (हंग्रीबोमानहळ्ळी), रमेश बांदीसिद्दीगौडा (श्रीरंगपट्टण), इक्बाल अन्सारी (गंगावती), अखंडा श्रीनिवास मूर्ती (पुलकेशीनगर) आणि एच.सी. बालकृष्ण (मागाडी) यांचा समावेश आहे.रमेश बांदीसिद्दीगौडा यांनी विधानसभा अध्यक्ष के. बी. कोलिवाड यांच्याकडे आपला राजीनामा शुक्रवारीच सादर केला आहे, तर बंडखोरांचे नेते जमीर आणि चेल्लुवार्यस्वामी यांनी विधानसभा अध्यक्षांकडे शनिवारी राजीनामा सोपविला आहे.
कर्नाटकात जनता दलाचे सात आमदार काँग्रेसमध्ये जाणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 12:23 AM