बंगळुरू : काँग्रेस-जनता दल (सेक्युलर) आघाडीच्या कुमारस्वामी सरकारला पुरेसे बहुमत नसल्याचा आक्षेप घेत भाजपा आमदारांनी प्रचंड गदारोळ माजविल्याने कर्नाटक विधानसभेचे कामकाज गुरुवारी दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. बुधवारीही असाच प्रकार घडला होता.काँग्रेसने व्हिप जारी करूनही अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी त्या पक्षाचे नऊ आमदार विधानसभेत गैरहजर राहिले होते. गुरुवारीही तेच चित्र दिसले. त्यामुळे सरकारला बहुमत नसल्याचा मुद्दा उपस्थित करून भाजपाचे आमदार विधानसभा अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत जमा झाले. मुख्यमंत्री कुमारस्वामी विधानसभेत येऊन आपल्या आसनावर बसण्याआधीच कुमारस्वामी परत जा, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्या, अशा घोषणा भाजपा आमदारांनी देण्यास सुरुवात केली. या आमदारांनी आपापल्या जागी बसून घ्यावे ही विधानसभा अध्यक्षांनी केलेली सूचना पाळण्यात आली नाही. या गदारोळामुळे विधानसभेचे कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. नंतर कामकाजाला प्रारंभ होताच भाजपा आमदारांनी घोषणाबाजी सुरू ठेवली. सरतेशेवटी सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. (वृत्तसंस्था)महाराष्ट्रात मुक्कामउमेश जाधव, महेश कुमटल्ली, रमेश जर्किहोळी, बी. नागेंद्र हे काँग्रेसचे असंतुष्ट आमदार भाजपाच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. काँग्रेसचे आमदार आनंद सिंह यांना मारहाण केल्याप्रकरणी त्यांचे सहकारी आमदार जे. एन. गणेश यांचा पोलीस शोध घेत आहेत.भाजपा नेते येडियुरप्पांचे पुत्र काँग्रेसच्या तीन आमदारांसह मुंबईतील हॉटेलात राहत असून, महाराष्ट्रातील भाजपाचे विधान परिषद सदस्य प्रसाद लाड यांच्या ते संपर्कात आहेत, अशी चर्चा आहे.
कर्नाटक विधानसभा दिवसभरासाठी तहकूब, भाजपा आमदारांचा गदारोळ
By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2019 4:43 AM